आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर यांनी दिली माहिती
सावंतवाडी
मोती तलाव परिसरात लावण्यात आलेल्या कचराकुंडीत नियमित कचरा टाकणाऱ्या पर्यटकांच्या विरोधात येथील पालिकेने कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्या ठिकाणी प्लास्टिक कप, चमचे आदी वस्तू टाकण्यासाठी सोय करण्यात आली असताना थेट घरगुती कचरा मिळाल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. संबंधित व्यक्ती ही मुंबईतील असून त्याचा शोध घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर यांनी सांगितले.
येथील मोती तलावाच्या परिसरात बसणाऱ्या नागरिकांना आईस्क्रीमचे कप तसेच अन्य किरकोळ कचरा टाकण्यासाठी तलावाच्या भोवती कचराकुंड्या लावण्यात आल्या आहेत. मात्र गेले काही दिवस त्यात घरातील कचरा आणून टाकल्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून त्या कचऱ्याचे विलगीकरण करून नेमका कचरा कोणाचा याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान काल शोध घेत असताना मुंबईतील एका व्यक्तीचा कचरा त्या ठिकाणी आढळून आला. विशेष म्हणजे त्या कचऱ्यात आधार कार्डची झेरॉक्स होती. त्यामुळे त्याआधारे त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. नाटेकर यांनी सांगितले. लोकांना किरकोळ कचरा टाकण्यासाठी या कचराकुंड्या बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी घरगुती कचरा टाकू नये. अन्यथा कारवाई करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.