दोन दिवस पक्ष संघटनेचा तालुकानिहाय आढावा
कणकवली
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ३० नोव्हेंबर पासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. यात १ आणि २ डिसेंबरला ते तालुकानिहाय पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते रत्नागिरी, रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस परशूराम उपरकर यांनी दिली.
येथील मनसे संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याची माहिती दिली. त्यांच्यासोबत मनसे जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते. श्री.उपरकर म्हणाले, पक्ष संघटनेची नव्याने बांधणी करण्यासाठी राज ठाकरे कोकण दौरा करणार आहेत. या दौऱ्याचा प्रारंभ सिंधुदुर्ग पासून होणार आहे.
श्री.ठाकरे हे ३० नोव्हेंबरला सिंधुदुर्गात येणार आहेत. तर १ आणि २ डिसेंबरला ते प्रत्येक तालुका तसेच प्रत्येक मतदारसंघ निहाय कार्यकर्त्यांशी भेटी गाठी आणि चर्चा करणार आहेत. जिल्ह्यातील पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशीही ते चर्चा करणार असल्याचे श्री.उपरकर म्हणाले.
श्री.ठाकरे यांच्या या दौऱ्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील मनसे पदाधिकारीही सहभागी होणार आहेत. दरम्यान श्री.ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी दोन ते तीन दिवस आधी मुंबई परिसरातील पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गात यावे असे आवाहन श्री.उपरकर यांनी केले. ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे सिंधुदुर्गातील मनसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर श्री.ठाकरे हे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचाही दौरा करणार असल्याची माहिती श्री.उपरकर यांनी दिली.