*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*उगाच काही बोलू नका हो …*
उगाच काही बोलू नका हो उपमर्द कुणाचा करू नका
गांभीर्याला हलकेपणाने गंमतीनेही घेऊ नका
हेतू असो वा हेतू नसू दे तापदायक होतो ना
दुखावले जर असेल नकळत मान्य करूनी टाका चुका…
हसण्यावारी नेता गोष्टी काळच सोकावतो पहा
एकाजागी पुन्हा पुन्हा मग होती पहा ना चुका दहा
वेळीच करावी चूक दुरूस्ती महागात मग पडते ती
द्यावे लागते मोल भयंकर मनात बसते तिची भीती …
माणूस आहे सुज्ञ परंतू का न उलगडते कोडे
माहित असूनी नको तिथे तो दामटतो आपुले घोडे
हसू करूनी घेऊ नका हो दुसऱ्याला ही हसू नका
स्पष्ट नि साधे सरळ असावे हवा कशाला ताण फुका…
बुद्धिवंत जर आहोत आपण अज्ञाताचा ध्यास धरू
कवीकुळाचे वारस आपण पूर्वसुरींना अनुसरू
सात पावले असती त्यांची साथ आपली हवीच ना
साहित्याची शपथ तुम्हाला करू नका ना असा गुन्हा…
परिपूर्ण ना येथे कोणी बेडूक होऊन फुगू नका
देव न आपण येथे कोणी चुकांतूनच काही शिका
साहित्याचे पाईक होऊ हाती घेऊ या हात चला
तू ही भला अन् मी ही भला रे बोलायाला विसरू नका….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २१/११/२०२२