*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*संवादाचा मंत्र.(.ॐसंवादाय नम:)*
मंत्र म्हणजे एक ध्वनी,एक शब्द, एक अक्षर, किंवा अनेक शब्दांचा एकत्रित समूह. ज्याच्या पुनरुच्चाराने भौतिक, आत्मिक, आणि आध्यात्मिक उन्नती होते.
मननात त्रायते इति मंत्र:।
म्हणजेच मंत्र या शब्दाची फोड केली तर मं हे मानवी मनाचे प्रतीक आहे, जे मनन अथवा चिंतन करण्यास सक्षम आहे. आणि त्र या प्रत्ययाचा अर्थ होतो संरक्षण. म्हणजेच मनाचे संरक्षण करण्याची ताकद मंत्रात आहे.
एकदा मंत्र या शब्दाचा अर्थ आणि महत्त्व समजून घेतले की संवादाचा मंत्र या दोन शब्दातला अर्थ आणि भाव लक्षात येतो. संवाद एक मंत्र— किंवा संवादरूपी मंत्र— संवादाचा मंत्र— अशी उलगड करून संवाद या प्रक्रियेशी मानवी जीवनाचे नक्की नाते काय? त्याची आवश्यकता किती आणि का आहे? याचे चिंतन करावेसे वाटते. विशेषतः बदलते समाज जीवन, बदलत्या जीवन पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानामुळे झालेली सारीच उलथा पालथ आणि या सर्व गदारोळात हरवलेला, गुदमरलेला संवाद. दोन व्यक्तींमधला जोडणारा एक पूल, वेडा वाकडा ढासळलेला दिसतो.
संवाद हा कमीत कमी दोन व्यक्तींमध्ये असतो. तो वाचिक किंवा कायिकही असू शकतो. तो जितका शाब्दिक तितकाच अबोल, शब्दांच्या पलीकडला ही असू शकतो. तो स्व मनातला असू शकतो,किंवा मनांमनांतलाही असू शकतो.
जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की,
” तू माझ्या मनातले बरोबर ओळखलेस.” किंवा “तू अगदी माझ्याच मनातले विचार मांडले आहेस.” तेव्हा अशा प्रकारचा शाब्दिक संवाद उच्च कोटीचा असतो. अशा व्यक्तींना भवतालच्या मानसिकतेचा अभ्यास आणि व्यक्त होण्याची क्षमता असते. आणि म्हणूनच असे संवाद एखाद्या परिणामकारक मंत्रासारखे, मानवी जीवनावर परिणाम करतात, मार्गदर्शक ठरतात.
असे म्हणतात कुठलाही मंत्र हा गुरु कडून घ्यावा कारण मंत्राच्या चुकीच्या उच्चारणाने दुष्परिणामही होऊ शकतात. संवादाच्या मंत्राचे सुद्धा असेच आहे. संवाद हा सुसंवाद हवा. जोडणारा हवा, तोडणारा नको. सुकृत हवा विकृत नको. ज्या संवादात हळुवारपणा, मार्दव, माधुर्य, समोरच्या व्यक्तीला समजावून घेत आंजारुन गोंजारुन त्याला योग्य मार्गावर आणणं किंवा चुकीच्या मार्गावरून परतवणं असतं तो दिव्य संवाद!
कोणत्याही मंत्राची सुरवात ओंकाराने होते. तशीच संवाद मंत्राची सुरवात ताई,दादा,भाऊ,काका किंवा जय श्री कृष्ण
अथवा हरी ओम् अशा संबोधनाने झाली तर नकळतच एक
नात्याचा धागा गुंफतो.ईंग्रजी भाषेत हाय्,हॅलो,फारतर मॅडम,सर असे ठराविकच संवाद संबोधने आहेत. पण आपल्या भाषेत कितीतरी प्रेमाचा ओलावा देणारी संबोधने आहेत ,जी संवाद मंत्राची शक्ती ठरते..
संवाद म्हणजे उपदेश नव्हे. नुसतेच वाक्ताडन नव्हे. तिथे अहंकार, श्रेष्ठत्वाची भावना असेल तर त्याचा परिणाम उलटा होऊ शकतो. तो रिपल्सीव्ह किंवा रीव्होल्टींग होऊ शकतो. ‘ हे करू नको तू, ते करू नको’ ‘ तुला असेच वागले पाहिजे” हेच शिकले पाहिजे’ अशी सक्ती केली जात असेल तर त्यावेळी विद्रोहाची भावना जन्माला येते. वृत्तीला हिंसक वळण लागू शकते. अशा वेळी सुसंवादाचा मंत्र कामी येतो. चर्चात्मक संवादातून अनेक प्रश्न सुटू शकतात.
जे कृष्णमूर्ती नेहमी सांगत नो युवर सेल्फ(KNOW YOURSELF). स्वतःला ओळखा. ‘नो युवर सेल्फ’ हा एक श्रेष्ठ संवादाचा मंत्र आहे.
जेव्हा एखादी कामवाली बाई काम करताना अनंत चुका करते, सारं इकडचं तिकडे करून अव्यवस्थाच करते, कधी हलकीफुलकी चोरी ही करते, त्यावेळी तिला जर म्हटले “अशाने मी तुला कामावरूनच काढून टाकेन, तुझा पगारच कापेन” तर अशा वक्तव्याने परिस्थिती अधिक चिघळू शकते. ती फारच डोईजड होत असेल तर तिला चांगल्या शब्दात समज देऊन तुम्ही तिला मुक्त करू शकता. किंवा “अगं तुला काही अडलं तर मला विचार, तुला काही हवं असेल तर मला माग ना..,”हे उद्गार नक्कीच प्रभावी ठरू शकतात. तिच्याशी वैयक्तिक पातळीवर, कुठल्याही प्रकारचा दुराग्रह न ठेवता संवाद साधला तर योग्य परिणाम होऊ शकतो. अखेर गरज दोघांचीही असते. मात्र संवादात लाचारी नसावी पण आर्जव आणि तडजोड जरूर असावी. ‘थोडं तुझं थोडं माझं’ ही भावना खूप चांगली ठरते. दोन मार्ग संपूर्णपणे वेगळे करण्याआधीचा हा संवादमंत्र नक्कीच फलदायी ठरू शकतो.कामवालीचे केवळ एक उदाहरण. मात्र कुणाला एकदम तोडून टाकण्यापेक्षा हे करुन पहावे इतकेच..
एकांत आणि एकलकोंडेपणा हे दोन वेगळ्या अर्थाचे शब्द आहेत, वेगळ्या भावनेचे आहेत. एकांतात संवाद असतो. स्व मनाचे केलेले सकारात्मक निरीक्षण असते. मात्र एकलकोंडेपणात विकृती असते, न्यूनगंड असतो. संवादाचे तुटलेपण असते. आणि दोन नात्यातले दूरत्व असते. जेव्हा आपण म्हणतो आज समाज विस्कटलाय, नाती तुटली आहेत, परस्परांविषयी आस्था उरली नाही, माणूस अधिक आत्मकेंद्री बनला आहे, स्पर्धेच्या उत्तुंग यशाच्या कल्पनेपायी मृगजळापाठी तो धावतोय्. अशा वेळी सावर रे! सावर रे! या आक्रंदनाला कोणते उत्तर असेल, कोणता मंत्र असेल तर संवाद. संवादाचा मंत्र.
काय असतो संवादाचा मंत्र?
“तुला हे नक्की जमेल”
“पुन्हा प्रयत्न कर”
“एक दार बंद झाले तर दुसरे उघडेल”
“आज नही तो कल.There is always a next time.”
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”
“आज तू छान दिसतेस”
अशी कितीतरी संवादातील वाक्ये मंत्रासारखी अश्वासक आणि शक्तीशाली ठरू शकतात.
भौतिक जीवनाचा अफाट पसारा झालाय. माणूस सोशल मीडियात आकंठ रुतलाय्. लहान थोर सारीच मंडळी या भोवऱ्यात इतकी अडकली आहेत की एकमेकांशी बोलण्यापेक्षा या आभासी दुनियेशीच त्यांचं नातं घट्ट होत चाललंय्, आणि नकळतपणे जीवनात एकलेपणा, नैराश्य, गोंधळ, बेचैनी, सैरभैरता वाढत चालली आहे.
परवाच एकतर्फी प्रेमातून घडलेली. मनाचा थरकाप करणारी घटना वाचली आणि मन उद्विग्न झाले. घटनेचा संपूर्ण वृत्तांत देण्यापेक्षा त्या घटने विषयी मला एवढंच म्हणावसं वाटतंय् की हा अमानुषपणा येतो कुठून? मग ओटीटी.वरच्या, इतर माध्यमांवरच्या हिंसात्मक कहाण्यांवर अंगुलीनिर्देश केला जातो. . गलिच्छ राजकारणावर टीका होते. नेत्यांचा उद्धार होतो. बेकारी, महागाई, भ्रष्टाचार या विषयांची ही होळी पेटते. पण मूळ गाभ्यापर्यंत कुणाला का जावेसे वाटत नाही? याचे एकच कारण आहे हरवलेला सुसंवाद. दोन नात्यातला, कुटुंबातला, समाजातला.
खरं म्हणजे संवाद हा गर्भातूनच सुरू होतो. पण जगण्याच्या वाटेवर तो मध्येच असा तुटून पडलाय याची जाणीवच हरवली आहे.
भगवद्गीता हा आपला पवित्र ग्रंथ. पण मुळात तो एक संवाद आहे. गुरु शिष्यामध्ये झालेला! मित्रत्वाचा, बंधुत्वाचा, सत्याचा संवाद आहे. प्रेमळ, ममतापूर्ण, मार्गदर्शक संवाद. युगंधराने पार्थाशी केलेला महान संवाद. हा संवाद जर घडला नसता तर पार्थ रस्ता चुकला असता. आणि असत्य, अनिती, अराजकता, अधर्म माजला असता. नेमका समाजातला हाच आदर्श संवाद हरवला आहे.
कुणीतरी माणसाला सांगायला हवे,
” अरे तुझ्या डोक्यावरचे आभाळ बघ, नजर उंच कर, चंद्र तारे बघ ,झाडांवरच्या पक्षांची किलबिल ऐक, अगदी कठड्यावरच्या कावळ्याची काव काव ऐकण्याचा प्रयत्न कर, वर्षा ऋतूतील मोरांची केका ऐक, वसंतातल्या कोकिळेचा पंचम कर्णात साठव.”
निसर्गातही संवाद आहे. सौंदर्य, प्रेमाची शिकवण आहे. पण दृष्टी हवी, कर्ण हवेत, आणि या सर्किटाशी तार जुळवून देणारा संवाद हवा.
विषयाचे प्रतिपादन करताना माझ्याकडून विषयांतर झालेही असेल. पण विषयांतर हा ही संवादाचाच भाग असतो नाही का?
थोडक्यात काय यशस्वी, सुखी, आनंदी, निर्धोक जीवनासाठी हाच मंत्र जपावा.
वाद हवा,संवाद हवा, सुसंवाद हवा. शब्दांचे साकव बांधा.शब्दांनी जोडा.
ॐ संवादाय नमः ।।
राधिका भांडारकर.