सिंधुदुर्ग
शिवाजी महाराजांना कालबह्य ठरविणाऱ्या राज्यपाल कोशारी यांनी हे लक्षात ठेवावे की तुमची काळी टोपीच कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे तुमचे काळे विचार हे फक्त तुमच्यासारख्या काळ्या कुळकुळीत हृदयाच्या लोकांनाच आवडतील. छत्रपती शिवाजीमहाराजांचे विचार कधीच कालबाह्य होऊ शकत नाहीत. महाराजांनी आपल्या कर्तृत्वातून आणि कृतीतून समाजासमोर असा आदर्श ठेवला आहे की तो आदर्श कधीही कालबाह्य होऊ शकत नाही. ज्या काळात चार वर्णानुसार कामधंदा करणे बंधनकारक असताना अठरापगड जातीच्या आणि सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. समुद्रात जाण्यानजाण्या संदर्भात अनेक रुढी परंपरा असताना त्याच समुद्रात स्वराज्याच्या रक्षणासाठी आरमार निर्माण करणारे समाजसुधारक छत्रपती शिवाजीमहाराज आजही तुमच्या सारख्या काळ्या टोपी धारकांना पचनी पडत नाहीत म्हणून काळ्या टोपी सारखे काळे मन असणारे आपण आमच्या छत्रपतींचा वारंवार अपमान करत आहात.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांनी औरंगजेब यांची पाचवेळा माफी मागीतली असे संतापजनक विधान केले आहे त्यांचा आणि राज्यपाल कोशारी यांचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. मतासांठी छत्रपती शिवाजीमहाराज यांचा वापर करणारे भाजपवाले छत्रपतींचा एवढा अपमान होत असताना कुठे तोंड लपवून बसले आहेत. कोशारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी जाहीर माफी मागावी तसेच माननीय राष्ट्रपती यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे.