*ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकारा सौ.सुनंदा भावसार, नंदुरबार लिखित अप्रतिम गझल रचना*
निश्चयाच्या अंकुशाने ठेवला काबूत आहे
जीवनाचा मत्त हत्ती…मी कुशल माहूत आहे
का तुझाही हट्ट इतका की भविष्यालाच पाहू
वर्तमानाला पहाना जो उद्याचा भूत आहे
तू शहाण्यांच्याप्रमाणे आजही पण हे पहा की…
जायचे ते दूssर गेले जे अता शाबूत आहे
वादळे भूकंप दुष्काळामुळे हैराण आम्ही
बांधतो आम्ही घराचे स्वप्न जे वाळूत आहे !
काळ येतोही बिकट पण तो कुठे थांबून असतो…
कवळलेले दुःख कायम का बरे बाहूत आहे?
लाख इच्छांचाच माझ्या मी खुषीने उंट केला
मी स्वतःबाहेर माझ्या उंट तो तंबूत आहे
सौख्य आणिक दुःखसुद्धा तू सुनंदा घेत जाना
जीवनाचे सत्य दर्शन दोन ह्या बाजूत आहे
©®सौ.सुनंदा सुहास भावसार
नंदुरबार