मुंबई :
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध संमोहन तज्ञ मनोहर नाईक यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले. गेली अनेक वर्षे ते मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होते. दरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा-खासबाग येथील मूळचे असलेले श्री.नाईक हे कामानिमित्त मुंबईतच वास्तव्यास होते. त्यांच्या निधनानंतर शिरोडा वासीयांसह त्यांच्या शिष्यवर्गातून व चाहत्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
श्री.नाईक यांचे बालपण शिरोडा गावात गेले. लहानपणापासूनच त्यांना जादूचे प्रयोग करण्याची आवड होती. त्यातूनच शाळेच्या एकदा स्नेहमेळाव्यात त्यांनी आपल्या जादूच्या प्रयोगांचे सादरीकरण केले. यावेळी शाळेतील एका शिपायाने एक रुपयाचे बक्षीस देऊन केलेले कौतुक हे त्यांच्या आयुष्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले. तेथूनच त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात जादूगरया क्षेत्राकडे वळवली.व त्यानंतर त्याच क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. त्या ठिकाणी त्यांनी जादूगर व संमोहन क्षेत्रातील धडे घेऊन एक सुप्रसिद्ध जादूगर व संमोहन तज्ञ अशी आपली ओळख निर्माण केली. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेकांना जादूगर व संमोहन क्षेत्राचे धडे दिले. त्यातूनच त्यांनी आपला मोठा शिष्यवर्ग याठिकाणी तयार केला होता.आसोली हायस्कूलचे संस्थापक कै.दादा धुरी यांचे ते मामेभाऊ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.