You are currently viewing सामाजिक कार्यकर्त्या नवदुर्गा अर्चना शेटे

सामाजिक कार्यकर्त्या नवदुर्गा अर्चना शेटे

नवरात्रोत्सवात सामाजिक कार्य करणाऱ्या नवदुर्गांचा आपण परिचय करुन घेत आहोत
आजच्या आपल्या सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा आहेत अर्चना शेटे

अर्चना शेटे या व्यवसायाने शिक्षिका असून ठाणे म्युनिसिपल कार्पोरेशनच्या मतिमंद मुलांच्या धर्मवीर आनंद दिघे जिद्द विशेष शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.
विशेष मुलांसाठी काही तरी कराव अस त्यांना शालेय वया पासून वाटत होत. त्या दरम्यान अपंगत्व हे बहुतेकदा शारीरिक व्यंगापुरते गंभीर मानले जात होते. पोलिओबाबत जनमानसात जागरूकता होती. पण तद्नंतर मतिमंदत्वाचे समाजात वाढणारे प्रमाण त्यांच्या शिक्षण, उपचारांविषयी व पुनर्वसनाबाबत संशोधनास कारणीभूत ठरत होती. विषेश मुलांमधे काम करायला त्यांनी १९९० पासूनच सुरवात केली होती.
शैक्षणिक अध्ययन क्षमता कमी असणाऱ्या मुलांमध्ये त्या रमायच्या.
लग्नानंतर ठाण्यात आल्यावरही त्यांनी हे कार्य सुरुच ठेवल आणि त्याच दरम्यान २००१ साली ठाणे महानगरपालिकेने आपल्या जिद्द विशेष शाळेत मतीमदांकरिता नवीन विभाग सुरू केला.
२००१ पासून अर्चनाताई जिद्दसोबत जोडल्या गेल्या आणि त्यांना मतिमंद मुलांच्या शाळेत सेवा करण्याची संधी मिळाली.
अर्चनाताई सांगतात त्यांच्या आईच्या मैत्रिणीचा अपंग,मतिमंद मुलगा पाहून त्या न कळत्या वयात त्यांना या अपंगत्वाची कारणं, मर्यादा कळल्या नाहीत पण या अशा मुलांसाठी आपण काहीतरी करावं ही मनात जिद्द निर्माण झाली. मग त्यांनी रितसर प्रशिक्षण घेतल.
मतिमंदत्वाप्रमाणेच अपंगत्वाचे अजून ही अनेक प्रकार बालकांची बौध्दिक वाढ खुंटवणार, क्षमता कमी करणारे व त्यांना सर्वसामान्य आयुष्य जगू न देणारे असतात हे त्या प्रशिक्षणातून समजले. अशा मुलांना सर्वसामान्य मुलाप्रमाणे वाढवण कठिण असल तरी अशक्य नक्कीच नाही अस जाणवलं. या सर्व विशेष विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल यासाठी त्या सतत प्रयत्न करतात. नुसती प्रगतीच नव्हे तर त्यांचं ते ज्या समाजाचे घटक आहेत, त्या समाजातच त्यांचे पुर्नवसन होण अत्यंत गरजेच आहे अस त्यांचे ठाम म्हणणे आहे. त्यांची सर्वागीण विकास व्हावा म्हणून विद्यार्थ्याना विविध उपचार पद्धती शाळेतच विनामुल्य उपलब्ध होतील या कडे त्या जातीने लक्ष देतात….
दिव्यांगांच्या पुनर्वसनात त्या व्यक्तीचे कुटुंब व त्यांची शाळा याव्यतिरिक्त त्यांचे शेजारी, परिसरातील व्यक्ती अगदी दुकानदार ते फेरीवाले, नातेवाईक हे समाजातील विविध घटक ही अत्यन्त महत्त्वाची भूमिका बजावतात. या दृष्टीने पालकांचे मन:स्वास्थ्य नीट राहून आपल्या पाल्यासोबत ते अधिक क्षमतेने काम करू शकतील याची ही काळजी त्या घेतात. याच दृष्टिकोनातून शाळेत पालकांसाठी विविध विषयांवर कार्यशाळा आयोजित केल्या जातात. या सर्व सेवा व सुविधा ठाणे महानगरपालिका जिद्द शाळेच्या माध्यमातून आपल्या नागरिकांकरिता उपलब्ध करून देते.
विद्यार्थ्यांसोबतच पालकांच्या सक्षमीकरणावर अर्चनाताई भर देतात. आपल्या पाल्याचे अपंगत्व मान्य करून, त्यांच्या मर्यादा ध्यानात ठेवूनच स्वावलंबी बनवणे किती महत्वाचे आहे हे स्पष्ट करताना त्या या विशेष मुलांमध्येही खूप कौशल्ये असल्याचे सांगतात व ही कौशल्ये विकसित करूनच त्याआधारीत त्यांच्या स्वावलंबनाचा व पुनर्वसनाचा मार्ग रेखणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करतात.
विद्यार्थी अठरा वर्षे वय पूर्ण झाल्यावर जेंव्हा शाळेतून बाहेरच्या जगात, समाजात प्रवेशितो तेंव्हा तोच नव्हे तर पालकही भांबावलेले, संभ्रमित असतात. इथे महत्त्वाची भूमिका असते ती समाजाची! प्रशिक्षित होऊन, कौशल्ये आत्मसात करून नवीन जगात पाऊल टाकलेल्या या उमेदवारास समाजाने त्याच्या मर्यादा समजून घेऊन नोकरीची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. इथे दया किंवा कींव न करता साधक बाधक विचारानेच निर्णय घेणे महत्त्वाचे…दिव्यांग व्यक्तीस स्वावलंबी जीवन जगण्यास प्रवृत्त करून त्यांना समाजातील एक उत्पादनशील घटक म्हणून आत्मसन्मान मिळवून देणे ही आपण सर्वांचीच नैतिक जबाबदारी असल्याचे परखड मत अर्चनाताई मांडतात.
हळव्या पण निश्चित धेय्याचा सातत्याने मागोवा घेऊन मतिमंद मुल आणि पालकांच्या आशा तेवत ठेवणा-या पालक आणि मतिमंद मुलांचे प्रेरणास्थान असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या दुर्गेस आम्ही लेखिकांकडून मानाचा मुजरा.

सौ.मानसी मोहन जोशी
कार्यवाह आम्ही लेखिका
ठाणे शाखा.

प्रतिक्रिया व्यक्त करा