You are currently viewing पत्रास कारण की,..(पत्र संस्कृती)

पत्रास कारण की,..(पत्र संस्कृती)

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य… लालित्य नक्षत्रवेल… श्रीशब्द समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखीत पत्र संस्कृतीच्या आठवणी जागृत करणारा अप्रतीम लेख*

*पत्रास कारण की,..*(पत्र संस्कृती)

पत्र….
शब्द जरी कानावर पडला की मान दाराकडे आपसूकच वळायची. खरंच, सुवर्णदिन म्हणायचं त्या दिवसांना….किती ती आतुरता असायची…पोष्टमनच्या सायकलची घंटी वाजण्याची…पोष्टमन येण्याची अन् त्यांच्या खांदावर असलेल्या झोळीत आपल्यासाठी आपल्या नावे आलेलं पत्र असण्याची…!
*पत्र तुझे ते येता अवचित*
*लाली गाली खुलते नकळत*
आपलं पत्र आलं की प्रथम चार वेळा स्वतःचंच नाव वाचलं जायचं, मग कोणी पाठवलं? हे पाहण्याची कोण उत्सुकता…!
नाजूकपणे पोष्ट पाकीट फोडलं जायचं…अंतरदेशीय पत्र असलं तर जरा जपूनच…!
अन्यथा एखादा शब्द फाटलेल्या तुकड्या बरोबर दुसऱ्या बाजूस जायचा तर मनात भीती… पोष्ट कार्ड तर १५ पैशांचं… गावभर वाचतील म्हणून शक्यतो कोणी पाठवायचं नाही. पोष्टकार्ड यायचं ते सरकारचं…!
ति. आई बाबांस….
शिरसाष्टांग नमस्कार….
पत्रास कारण की, ….
किती तो आदर आपल्या तिर्थस्वरूप आई वडीलांविषयी…!
ज्या आई वडिलांनी रक्ताचं पाणी करून आपल्याला लहानाचं मोठं केलं, ऐपतीनुसार शिकवलं, वेळप्रसंगी स्वतः चतकोर खाऊन पाणी पिऊन राहिले पण आपल्याला पोटभर अन्न दिलं, गाडी खर्चासाठी, राहण्याची सोय व्हावी आणि मुलाला शहरात नोकरी मिळावी… घरची गरिबी दूर व्हावी या आशेवर अंगावर असलेला एखादा दागिना विकून, गहाण ठेऊन मुलाला दूर शहरात नोकरीसाठी धाडलं, त्यांचे उपकार मुलाच्या पत्रात लिहिलेल्या एक एक शब्दातून झिरपत असतात आणि मुलाचं पत्र दुसऱ्याने वाचून दाखवताना आपला मुलगा खुशाल आहे हे ऐकून त्यांच्या डोळ्यातून सुखाश्रू टप टप गालावरून ओघळत असतात.

*हे पत्र तुला लिहिताना का अबोल होते शाई*
*का रंग खरा शब्दांचा पानावर उमटत नाही*

पत्र कोणाचंही असो… पत्रास कारण की,… हे शब्द वाचले, ऐकले की पुढे काय लिहिलं हे वाचण्याची, ऐकण्याची जी उत्सुकता असायची ती शब्दात सांगणे आजही अशक्यप्राय…! पुढे शब्द कानावर पडताच डोळे आपोआप वाहत असायचे… काही वेळा तर पत्राचे कारण…नेहमीसारखेच असायचे परंतु ती उत्सुकता मात्र नेहमीच ताणलेली असायची…अगदी धनुष्यातून सुटणाऱ्या बाणापेक्षाही जास्त…! घरातली लहान-थोर सर्व मंडळी पत्रातील शब्दा शब्दाकडे कान लावून असायचे… “बाकी सर्व ठीक आहे…” हे पत्रातील शेवटचं वाक्य ऐकलं की, जीव भांड्यात पडायचा…
आपल्या जीवलगांपासून दूर असताना पत्र लिहिणे म्हणजे भावनिक क्षण असतो…मनातील उत्कट भावना पत्रातून रेखाटल्या जायच्या. कधी कधी मन भरून येतं अन् नकळत आसवांचे एक दोन थेंब पत्रावर गळायचे, शब्द अस्पष्ट व्हायचे, पुसले जायचे. पत्र वाचताना मात्र ते पाहून आपोआप गावातील घरच्यांचे डोळे भरून यायचे. त्या अस्पष्ट झालेल्या शब्दांवरून आपल्या प्रिय मुलाचे कुटुंबावर असलेले प्रेम अधोरेखित व्हायचे जे आजच्या व्हिडीओ कॉल मध्येही अनुभवता येत नाही. हाच अनुभव घेताना अशीही मुले असायची जी बाहेरगावी गेली की त्या रंगेल दुनियेत घर, कुटुंब विसरून जायची. तेव्हा घरचे त्यांच्या आठवणीने व्याकूळ होऊन पत्र लिहायचे…
*बडे दिनों के बाद इन बेवतनों के याद वतन से चिठ्ठी आयी हैं…!*
या भावनिक हिंदी गीतामधून आपण तो अनुभव घेतला होता. “आई-बाबा, मी चार दिवसांसाठी गावी येतो आहे”, हे वाक्य पत्रात लिहिलेलं असलं तर आई बाबांचा आनंद गगनात मावत नसायचा…मन मुलांसाठी काय काय करायचं हे बेत आखण्यातच रमून जायचं…! गावाकडून मुलगा मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात नोकरीवर जाताना म्हातारी आई मायेनं सांगायची…”जीव सांभाळून कामधंदा कर, आमची काळजी करू नको…शेजारचा राजा आहे आमच्यावर लक्ष ठेवायला पण तू सुखरूप जा…पोहचल्याचं पत्र मात्र आठवणीने धाड रे”…
पत्र आठवड्याने यायचं पण खुशाली मिळण्याची कळकळ तिच्या आर्जवातून दिसून यायची…
सैन्यात नोकरीला असणारा पती सीमेवर जाण्यासाठी बाहेर पडला की पत्नीचे डोळे भरून यायचे…हुंदका आवरत ती हळूच पुटपुटायची…”पत्र तेवढं आठवणीने पाठवा…काळजी घ्या स्वतःची”. तिच्या मनाची ती अवस्था तिच्याशिवाय कोणीच समजू शकत नव्हता…
प्रियकर प्रेयसीचे पत्र हा इतरांसाठी जरी खोडकर प्रश्न असला तरी त्या प्रेमाच्या धुंदीत असणाऱ्यांसाठी मात्र खूप भावनिक आणि मनाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारा, लपत छपत वाचून आतल्या आत गुदगुल्या करणारा विलक्षण क्षण असायचा.
*लिखे जो खत तुझो वो ‘तेरी याद में*
*हजारो रंग के नजारे बन गये*
असे काहीसे प्रेममय सूर त्या पत्रांमधून अलगद निनादायाचे… वाचणाऱ्या प्रियकर प्रेयसीच्या चेहऱ्यावरील भाव तेव्हा बरंच काही सांगून जायचे…!
लग्न झालेल्या बहिणीचे भावाला लिहिलेलं पत्र… तिची खुशाली वाचता वाचता अगदी तिच्या आठवणीत रमवून जायची अन् पापणीच्या कडा अलगद ओल्या व्हायच्या.
घरात कुठलेही कार्य असो वा सण समारंभ …आठवणीने सगेसोयरे, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना आमंत्रण जायचे ते पत्रातून… पत्रिका पाठविण्याचा प्रघात तेव्हा नव्हताच, तर पत्रातून आलेलं आमंत्रण म्हणजे प्रत्यक्ष उपस्थित राहून बोलविल्याची ग्वाही असायची. त्या पत्रातील शब्दांना फार मान असायचा कारण ते केवळ आपल्या प्रियजनांसाठी लिहिले जायचे. चांगल्या वाईट घटना देखील पत्रानेच कळविल्या जायच्या. उशिराने खबर मिळाली तरी त्यात भावनेचा ओलावा असायचा.
शाळा-कॉलेज संपवून आयुष्याच्या कितीतरी दिवस रात्री एकत्र घालवलेले मित्र-मैत्रिणी जेव्हा आपापल्या घरी जायचे तेव्हा त्यांच्या जुन्या दिवसातील आठवणींचा तर पत्रातून वर्षाव व्हायचा अन् त्या जुन्या आठवणींमध्येच दिवस हसत हसत सरून जायचे. ती मित्र मैत्रिणींची पत्रे म्हणजे ‘आठवणींचे गाठोडे’ जणू ‘अमूल्य ठेवाच’ जो कित्येक वर्षे जपला जायचा. मध्येच कधीतरी आठवणीने ती पत्रे काढून वाचली जायची आणि आठवणींना उजाळा मिळायचा…पुन्हा एखादं पत्र लिहिण्याची प्रेरणा जागृत व्हायची…!
पत्र ही एक संस्कृती होती जी काळाच्या ओघात, विज्ञान तंत्रज्ञान युगात लुप्त झाली. पण जग कितीही पुढे गेलं, सुधारलं, नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालं तरी पत्राची वाट पाहत घराच्या उंबरठ्यावर बसणारी ती माय…माळावर गुरे घेऊन गेले असतानाही रस्त्याने सायकलने जाणाऱ्या पोष्टमनला थांबवून ‘माझ्या झिलाची चिठ्ठी इली हा काय रे?’ असा भाबडा प्रश्न विचारणारा बाप…नातवाची खुशाली आली की नाही? याची चौकशी करणारे आजी-आजोबा…अगदी आपल्या मित्राने शहरातून पत्र पाठवलं की नाही ? अशी विचारणा करणारा शेजारचा मित्र…ह्या गोष्टी आता केवळ कथांमधून वाचायला मिळतील.. ते स्वर्गसुख भविष्यात आपल्याला अनुभवता येणार नाही.
*गेले ते दिवस, राहिल्या त्या नुसत्याच आठवणी*
*आता केवळ होईल, हृदयात त्या क्षणांची साठवणी*
शहराच्या चौकाचौकात, एस टी स्टँडवर, तिष्ठत उभ्या असणाऱ्या पत्रपेट्यानी आता कात टाकली आहे…वयाप्रमाणे पत्रपेट्या वृद्ध झाल्या आहेत, त्यांनाही एकाच जागी बसून गंज चढला आहे… हळूहळू आठवणी पुसट होत चालल्या आहेत…पोष्ट ऑफिसने देखील आपला मोर्चा स्नेह वृद्धिंगत करत करत पैशांच्या देवाणघेवाणीकडे वळविला आहे. पत्र येणे जरी कमी झालं तरी अजूनही क्वचित कधीतरी पोष्टमन दारावर येतो तेव्हा मात्र जुन्या आठवणी जाग्या होतात…
ती पत्रसंस्कृती जपून ठेवण्यासाठी आजही वाटतं… एखादं पत्र लिहावंच… शोधून एखादं कारण…
*”पत्रास कारण की…, !!”*

©【दिपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा