मुंबई:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंदिरे सुरू करण्याबाबत पाठविलेल्या पत्रावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. शहा यांनी ‘भगतसिंग कोश्यारी यांनी लिहिलेले पत्र मी वाचले असून या पत्रातले काही शब्द त्यांना टाळता आले असते’, असे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्र लिहिले होते. त्या पत्रावरून राज्यभरात सणसणीत वाद निर्माण झाले. ज्या दिवशी भाजप मंदिरे सुरू करण्याबाबत राज्यव्यापी घंटानाद करणार होते. त्याच दिवशी राज्यपालांनी हे पत्र पाठवले होते.
त्या पत्रात त्यांनी ‘मुख्यमंत्री आपले हिंदुत्व विसरले आहेत काय?’ असा प्रश्न राज्यपाल यांनी केला होता. तसेच ‘सेक्युलर’ हा आजवर नावडता असलेला शब्द मुख्यमंत्र्यांना आवडायला लागला का? अशी टीकात्मक विचार त्यांनी केले होते. त्यांच्या या टीकात्मक पत्रावरून राजकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चा झाली. मात्र त्यावर भाजप नेत्यांनी तोंडाला कुलूप लावले.
‘तुमच्याकडून हिंदुत्व शिकण्याची वेळ माझ्यावर आलेली नाही’, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल यांना सुनावले होते. त्याच वेळी शरद पवारांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली होती. ‘धार्मिक स्थळे उघडली नाहीत म्हणून तुम्ही कोणाची ‘सेक्युलर’ अशी अवहेलना करणार का?’, अशी विचारणा त्यांनी पत्राद्वारे केली होती. तसेच ‘राज्यपालाचे वागणे हे राज्यघटनेच्या चौकटी बाहेरील असून, यातील भाषा पाहून तुम्हाला माझ्या म्हणण्याची खात्री पटेल याची मला तिळमात्र शंका नाही. सेक्युलर हा संविधानिक शब्द आहे. दुर्दैवाने राज्यपालांनी लिहिलेले पत्र एखाद्या राजकीय नेत्याच्या भूमिकेत असल्यासारखे लिहिले असून घटनात्मक मूल्यांचा आदर हा राखला गेलाच पाहिजे,’ या हेतूने मी तुमच्याशी आणि जनतेशी या पत्राद्वारे संवाद साधत आहे, असे पंतप्रधान यांना पाठविलेल्या पत्रात शरद पवार यांनी म्हटले होते.
महाराष्ट्र सरकार व राज्यपाल यांच्यातील वाद होण्याचा हा पहिलाच प्रसंग नसून, या आधीही महाविद्यालयाच्या परीक्षा घेण्यावरून ही सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये तू तू – मैं मैं झाली आहे. आता राज्यातले भाजप नेते मंदिरविषयी प्रकरणातील पत्रावरून अमित शहांच्या नाराजीवर काय भूमिका घेतील, यावर सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित आहे.