वैभववाडी
खाजगी आराम बस आणि मारुती ओमनी गाडी यांच्यात झालेल्या अपघातात ओमनी चालक दर्पण प्रकाश राणे वय ४१ रा. ओझरम याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात रविवारी मध्यरात्री नाधवडे सरदारवाडीनजीक घडला. आराम बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयताचा भाऊ दर्शन प्रकाश राणे यांनी फिर्याद दिली आहे.
कोल्हापूर तळेरे राष्ट्रीय महामार्गावर ओमनी चालक दर्पण राणे हे आपल्या ताब्यातील ओमनी मारुती गाडी घेऊन वैभववाडीहून त्यांचा भाऊ दर्शन राणे यांच्यासह तळेरेकडे जात होते. नाधवडे सरदारवाडी येथे आले असता, खाजगी आराम बस नॕशनल ही घेऊन चालक राजाराम दयाळू राजभर वय ४३ रा.गोवा हे तळेरेहून वैभववाडीकडे येत होते. यावेळी आराम बसच्या डि.की.चा दरवाजा अचानक उघडला व दरवाजा ओमनी गाडीच्या ड्रायव्हर साईडला आदळला त्यामुळे ओमनी रस्त्याकडेच्या झाडाला जाऊन जोरात धडकली. या अपघातात ओमनी चालक दर्पण राणे यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मयताचा भाऊ दर्शन राणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आजगी आराम बस भरधाव वेगात हयगयीने व बेजबाबदारपणे बस चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी आराम बस चालक राजभर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.