कुडाळातील गणेश मूर्ती प्रदर्शनाचा समारोप
कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने मुर्तीकारांना कर्ज देऊन त्यांचे “हात” बळकट केले आहे. आता त्यांच्या उत्पादनांना मार्केटिंगची “साथ” देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन भाजपचे युवा नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांनी आज येथे केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने कुडाळ येथे घेण्यात आलेल्या गणेश मूर्ती प्रदर्शनाचा समारोप श्री राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक निखिल कोळंबकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक व श्री गणेश मूर्तिकार संघ, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय पर्यावरण पूरक गणेश मूर्ती प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रदर्शन गेले तीन दिवस ओंकार डीलक्स येथे सुरू होते. या प्रदर्शनाची सांगता झाली या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या गणेश मूर्तींचे परीक्षण करण्यात आले त्यानंतर स्पर्धेतील विजेत्यांना आणि सहभागी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक आत्माराम ओटवणेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, प्रभाकर सावंत, भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ संध्या तेरसे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, गणेश मूर्तिकार संघाचे अध्यक्ष बापू सावंत, आनंद शिरवलकर, तालुकाध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, राजू राऊळ, रुपेश कानडे राकेश कांदे नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, उदय तावडे शरद सावंत आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण चित्रकार अरुण दाभोलकर, आशिष बेलवलकर, डॉ. बापू परब यांनी केले तर पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे प्रात्यक्षिक अक्षय मेस्त्री व सिद्धिविनायक तेली यांनी दाखविले. त्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले की जिल्हा बँकेने ही चळवळ निर्माण केली आहे. पण या चळवळीला मार्केटिंगची जोड असणे आवश्यक आहे. आपल्या जिल्ह्यातला हापूस आंबा परदेशात विकला जातो पण तो विक्री करणारा जिल्ह्यातला बागायतदार नसतो तर बाहेरचा कोणीतरी येऊन त्या आंब्याची मार्केटिंग करून हा आंबा विक्री करतो. असे अनेकजण कोट्याधीश झाले आहेत. गणेश मूर्ती बनवणारे या जिल्ह्यातील कलाकार निष्णात आहेत. पण त्यांची ही कला जगाने ओळखली पाहिजे आणि या गणेश मूर्तींचे व्यावसायिक दृष्ट्या विकास झाला पाहिजे तर त्याला मार्केटिंग सर्वात महत्त्वाचे आहे. जिल्हा बँकेने या मूर्तिकारांना कर्जाबरोबरच मार्केटिंगची व्यवस्था कशी करता येईल याचेही मार्गदर्शन देणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.तर यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितले की, जिल्हा बँक या मूर्तीकारांसोबत कायमच राहिलेली आहे यावेळी हे प्रदर्शन लवकर घेण्यामागे कारण असे की या मूर्तिकारांना पुढील गणेश उत्सव येण्याअगोदर चांगल्या प्रकारे मुर्त्या बनवता येतील तसेच गणेश मूर्ती बनविणे आणि त्या विक्री करणे हा व्यवसाय उभा राहावा या दृष्टिकोनातून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी पनवेल सारखा गणेश मूर्ती कारखाना उभा राहावा अशी आमची धारण आहे याला मूर्तीकरांनी साथ देणे आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले सूत्रासंचालन शरद सावंत यांनी केले.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक निखिल कोळंबकर, द्वितीय सत्यवान पाटील, तृतीय धनंजय सुतार, उत्तेजनार्थामध्ये मंदार मेस्त्री, सिद्धिविनायक गिरकर तसेच इतर पारितोषिके आणि सहभागी स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले.