सावंतवाडी:
२० नोव्हेंबरला श्रीराम वाचन मंदिर सभागृहात सकाळी ११ वाजता चंद्रकांत जाधव यांच्या “ढगा आडचा चंद्र” या आत्मकथेच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. आपल्या संपूर्ण आयुष्यात शिक्षणासाठी शाळेची कधीही पायरी न चढता आणि गुराखी म्हणून काम केलेल्या सातार्डा येथील चंद्रकांत जाधव यांनी गुराखी म्हणून काम करीत शब्दांची ओळख करून घेत साक्षर बनलेल्या व त्या साक्षरतेतून आपल्या जीवनात घडलेल्या बऱ्या, वाईट घटनांचे प्रसंग अब्दशब्द केलेली आत्मकथा या पुस्तकातमांडली आहे.
मूळ सातार्डा येथील रहिवासी असलेल्या व सध्या कामानिमित्त पेडणे गोवा येथे राहणाऱ्या चंद्रकांत जाधव यांनी आपल्या आयुष्यातील उमेदीची सुमारे पंधरा वर्षे गुराखी म्हणून काम केले आहे. तत्पूर्वी वडील आणि मोठा भाऊ यांच्या आग्रहाखातर वाडीतील सवंगड्यासह आनंदाने शाळेत जाताना पहिल्याच दिवशी स्वतःच्या आईनेच पाटी दगडावर फोडून टाकून शाळेत जाण्यास विरोध केल्याने ते या धक्क्यानंतर पुन्हा कधीच शाळेत जाऊ शकले नाहीत. मात्र शिक्षणाबद्दल असलेल्या आवडीतून त्यांनी शब्दांची ओळख करीत साक्षर बनले.
दरम्यान आयुष्यातील अनेक पावसाळे दुसऱ्यांच्या गोठ्यात काढणाऱ्या चंद्रकांत जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या आत्मकथेतून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या जीवनात परिवर्तन घडविण्याचा निर्धार केला व गुराखी पदाचा त्याग करून स्वावलंबी बनून आंबेडकरी चळवळीत सक्रिय झाले. याच दरम्यान त्यांच्या मित्रपरिवारानी जीवनातील हे प्रसंग लिहून काढण्याचा सल्ला दिला आणि त्यातूनच ही आत्मकथा तयार झाली. या आत्मकथेच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन येत्या रविवार २० नोव्हेंबरला श्रीराम वाचन मंदिर सभागृहात सकाळी ११ वाजता मुंबईचे नामवंत लेखक व पत्रकार महावीर जोंधळे यांच्या हस्ते होणार आहे.
गोव्यातील पर्यावरणवादी कार्यकर्ते रमेश गावस हे प्रमुख वक्ते असून कवी व कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर ज्येष्ठ पत्रकार लेखिका प्रतिमा जोशी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन जनवादी साहित्य संस्कृती चळवळ महाराष्ट्र आणि मनोविकास प्रकाशन पुणे यांनी केले असून निमंत्रक प्रकाशक अरविंद पाटकर हे आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जनवादी साहित्य संस्कृती व मनोविकास प्रकाशन व चंद्रकांत जाधव मित्रपरिवाराने केले आहे.