समाजकार्यकर्त्या, लेखिका, कवयित्री,वसुधा नाईक, पुणे यांचा स्तुत्य उपक्रम
आज दि.१२/११/२०२२ रोजी आर्थिक परिस्थिती बेताची असणार्या व वर्षातून अगदी दोनच साड्या घेणार्या भगिनींना साड्यांचे वाटप केले.
दिवाळी मधे कपाट आवरायला काढलेअसता, जवळपास दोनशे साड्या निघाल्या असतील. त्यात काही खूप आवडीच्या, पण सध्या काठपदर साडी तनूवर नको असणार्या अशा वीस साड्या काढल्या ज्या साड्या पाच वर्ष झाली अगदीच वापरणे कमी केले होते.
दोन दिवसांपूर्वी कामवालीशी बोलताना जाणवले की, तिने चार वर्षात साडीच घेतली नाही. मग मी विचार केला, साड्या अशा पडून राहण्यापेक्षा कोणाला तरी उपयोगी होतील. या विचारातून ध्येय साधले अन कपाटभरून असलेल्या साड्यापैकी सतरा साड्या गरजवंतांना दिल्या..
या साड्यांची किंमत अगदी एक हजार ते तीन हजार पर्यंत आहे. आपल्या कपाटात पडून त्यांची किंमत वाढणार नाही, तर गरजवंतांनी वापल्यास नक्कीच ती अनमोल होईल ही भावना मनात कायम राहिली. माणसाला मोह सुटता सुटत नाही हे खरे. ही साडी नवर्याने वाढदिवसाला घेतली, दिवाळीला घेतली. अशा अनेक कारणांनी या मोहजालात अडकणे आता नाही. आपल्या आवडीच्या साड्या दिसू दे ना या भगिनींच्या तनूवर. साड्या देताना मला खूप आनंद झाला तर घेताना त्यांच्या मुखावरील आनंद ओसंडून वाहत होता साड्या साठीविण्यापेक्षा तो आनंद पापण्यांच्या आड साठवून ठेवला.
आनंद या जीवनाचा
सुगंधापरी दरवळावा
हा सुगंध सदा वाटप करावा….