युवा पिढीसाठी कणकवली,मालवण मध्येही लढा उभारण्याची गरज
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे एवढ्या मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत की जर त्यांच्या विरोधात जनतेने आवाज उठवला नाही तर येत्या काही वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनासाठी नव्हे तर अवैध धंद्यांचे माहेरघर म्हणून ओळखला जाईल. आम.नितेश राणे यांनी देवगड-जामसंडे भागातील अवैध धंद्यांच्या विरोधात उभारलेला लढा स्वागतार्हच आहे परंतु पक्ष कोणताही असो राजकीय पक्षांना निवडणुकांसाठी लागणाऱ्या पैशांसाठी राजकीय लोकांकडून अवैध धंदेवाल्या लोकांना राजकीय पदे देऊन अभय दिले जाते, त्यामुळे अवैध धंदे जिल्ह्यात फोफावले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
देवगड-जामसंडे हा भाग सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक टोक आहे, जिथे जिल्ह्याच्या रस्त्यांना पूर्णविराम मिळतो. आज अनेक नद्यांवर पूल झाल्याने गावे, तालुके जोडले गेले परंतु अनेकवर्षं देवगड तालुक्यातील काही गावांमध्ये हातभट्टीची दारू खाडीच्या किनारी अथवा खाडीच्या मध्यभागी असणाऱ्या बेटांवर काढली जायची जिथे पोलीस प्रशासन, अधिकारी पोचू शकत नव्हते. आंब्याच्या बागांमध्ये खड्डे खोदून दारूची पिंपे लपविली जात होती आणि पोलीस गावात आले तर पाण्यातून दारू पाडणारे पोबारा करायचे. परंतु आता परिस्थिती बदलली. गोव्यातील भेसळयुक्त दारू तस्करी करून जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र आणि बाहेरची पुरवली जाते. या अवैध दारूच्या व्यवसायात अनेक तरुण मुले पैशांच्या आशेपोटी अडकली जातात. आयुष्याची बरबादी करून घेतात, व्यसनांपायी स्वतःचा जीव गमावतात, कुटुंब उघड्यावर टाकतात. अनेक कुटुंब आपला कुटुंब चालक गमावतात, दारिद्र्य भोगतात.
आम.नितेश राणे यांनी अवैध धंदे, जुगार, मटका, अंमली पदार्थ आदीं विरोधात उभारलेला लढा हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या, व्यक्तीच्या विरोधात नसून देवगड जामसंडे शहरातील युवा पिढीच्या उज्वल भविष्यासाठी आहे. शहरात राजरोसपणे अवैध धंदे सुरू असल्याने युवा पिढी बरबाद होत आहे. त्यात अलीकडे जुगार, मटका हे अवैध धंदे तर ऑनलाइन पद्धतीने देखील खेळले जात आहेत त्यामुळे अशा खेळांमध्ये युवा पिढी नकळत गुंतली जाते आणि बरबाद होते. त्यामुळेच आम.नितेश राणे यांनी संबंधित व्यवसाय करणारे व्यावसायिक व राजकीय व्यक्तींची नावे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पोलीस प्रशासनाकडे देत ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आम.नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघातील देवगड जामसंडे व वैभववाडी ही छोटी शहरे विकासाच्या वाटेवर आणली. पर्यटनदृष्ट्या देवगड विकसित व्हावा ही त्यांची प्रामाणिक भूमिका राहिली आहे. पर्यटनातून रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता ते प्रयत्नशील असतात. त्यामुळे ज्या शहरांच्या विकासाची स्वप्ने पाहिली तेथील युवा पिढीच बरबादीच्या मार्गावर जात असेल तर अवैध धंद्यांच्या विरोधातील आम.राणेंची भूमिका रास्तच आहे. अशीच भूमिका कणकवली, मालवण आदी तालुक्यांमध्ये देखील घेतली जावी अशी अपेक्षा आहे. देवगड जामसंडे परिसरातील ज्या हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये अवैध धंदे केले जातात त्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे. याकामी राज्यात सत्तेत असलेले भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे सरकार देखील लक्ष देऊन योग्य ती कारवाई करेल. जिल्हा पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास १५ नोव्हेंबर रोजी आधी जाहीर केल्याप्रमाणे मोर्चा काढून अवैध धंद्यांच्या विरोधात एल्गार करणार असल्याचे सूतोवाच आम.नितेश राणे यांनी दिले आहेत.
आम.नितेश राणे यांनी अवैध धंद्यांच्या विरोधात आवाज उठविल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी देवगड पोलीस स्टेशनमध्ये भेट दिली होती. आपल्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेतल्याने त्यांनी एस पी सौरभ अग्रवाल यांचे आभार देखील मानले आहेत. त्याचबरोबर कोणते पोलीस अधिकारी पडद्यामागून हालचाल करून अवैध धंद्यांच्या अड्ड्यांवर जाऊन “आता बंद करा, समजून घ्या, काही दिवस बंद ठेवा, पुढचे पुढे पाहू” अशा सूचना देत आहेत यांची नावे देखील जिल्हा पोलीस प्रशासनाकडे दिली आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावे देखील बाहेर आली आहेत. तक्रार झाली, एस पी येणार म्हटल्यावर कॉलेज रोड ला रात्री १०.३० वाजता धाड पडली परंतु त्यापूर्वी का धाड पडली नव्हती? पोलीस अधिकाऱ्यांना आधी माहिती नव्हती का? अशा पोलीस अधिकाऱ्यांची देखील चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी आरोपी हा आमचा असला किंवा परका, राजकीय व्यक्ती असो वा कोणी बडी आसामी त्यांची गय न करता कारवाई करावी. कणकवली मध्येही अशी कारवाई केली होती त्याचीही आठवण आम.नितेश राणेंनी करून दिली. आम. नितेश राणेंनी अवैध धंद्यांच्या विरोधात घेतलेली भूमिका नक्कीच स्वागतार्ह असून देवगड जामसंडे येथीलच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्यांच्या विरोधात मोहीम उघडली पाहिजे. अवैध धंदे करणारे राजकीय पदांवर असतील तर त्यांना राजकारणातून मुक्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, तरच जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा बसेल आणि युवा पिढी बरबाद होण्यापासून वाचेल. जिल्हा पोलीस प्रशासन, नूतन पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी देखील विषय गांभीर्याने घेऊन अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यांमधूनही होऊ लागली आहे.