You are currently viewing ओळखतो साऱ्या चाली

ओळखतो साऱ्या चाली

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*ओळखतो साऱ्या चाली ..*

किंमत नाही मला जरी हो ऽऽऽऽ लोक किमती भवताली
फोलपट मी कितीही असलो ओळखतो साऱ्या चाली….

ग्रहगोलांचे चमचमणारे राज्य असू दे झगमगते
हिरा कोणता तयात आहे चांगलेच हो मज कळते…

जोडलीत हो किती माणसे खर्चिली ना कवडी मी
काळ धावतो वेगाने हो मागितली ना कधी हमी…

दो हाताने देता मिळते अफाट सारे धनगोत
कमावलेले सोने नाणे नेता येईना ते पोतं ….

नाती जोडा जोडा माणसे सुगंध त्यांचा होऊन
आठवणी त्या ठेवून जाव्या हृदयी त्यांच्या राहून …

क्षमा न करतो काळ कुणाला क्षमाशील आपण व्हावे
कोण बोलले काय बोलले मनातून ते काढावे…

आपण राजे असतो आपले साम्राज्याचे पहा धनी
उपजला ना ऐसा कोणी करेल कोणी मानहानी….

फूक मारूनी उडवावी हो वावटळ आल्यावरती
दुडक्या चाली अश्व चालतो, चाल असावी ऐरावती…

समजते पण उमजत नाही, नको बहाणा करावया
नकाच होऊ कारण आपण स्वत: स्वत:ला हरावया …

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ८/१०/२०२२
वेळ : संध्या : ४/५०

 

प्रतिक्रिया व्यक्त करा