मुंबई :
कोवीड-१९ या संसर्गावर सिरम इन्स्टिट्यूट लस तयार करत आहे. या लसीची चाचणी करण्यासाठी पश्चिम क्षेत्रातील भारती विद्यापीठाच्या भारती हॉस्पिटलची निवड करण्यात आली आहे. स्वंयसेवक म्हणून या चाचणीसाठी तयार झालेल्या पाच जणांवर भारती हॉस्पिटलमध्ये लसीची चाचणी सुरू करण्यात येणार असल्याचे राज्याचे सहकार, कृषी, अन्न, नागरी पुरवठा, मराठी भाषा, औकाफ राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी आज येथे दिली.
मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. कदम म्हणाले की, जगभरात कोवीड १९ वर लस शोधण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा कोरोनावर लसची निर्मिती सुरू आहे. या लसीची चाचणी करण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट व आयसीएमआरच्या वतीने देशभरातील १५ ठिकाणे निवडण्यात आली आहेत. त्यापैकी पुण्यातील भारती विद्यापीठाचे भारती हॉस्पिटल हे पश्चिम क्षेत्रातील एकमेव हॉस्पिटल आहे. गेल्या चार ते पाच महिन्यापासून भारती हॉस्पिटलमध्ये कोवीड १९ च्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत येथून दोन हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन बाहेर पडले आहेत.
सिरम इन्स्टिट्यूट व आयसीएमआरच्या माध्यमातून कोवीड लसीच्या चाचणीसाठी पाच जणांची निवड करण्यात आली असून हे पाचही जण स्वयंस्फूर्तीने यासाठी पुढे आलेले स्वयंसेवक आहेत. या पाच जणांची निवड ही आयसीएमआरच्या निकषानुसार झाली आहे. या पाचही जणांची पहिली आरटीसीपीआर चाचणी केली जाणार आहे. त्याच प्रमाणे जे तंदुरुस्त लोक आहेत, ज्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आहे, त्यांना ही लस देण्यात येणार आहे. त्यानंतर कोवीड १९ पॉझिटिव्ह असलेल्यांनाही लस देण्यात येणार आहे. या पाचही जणांच्या तब्येतीवर भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय टिम व आयसीएमआरचे संशोधक पुढील सहा महिने लक्ष ठेवणार आहेत. ही एक ऐतिहासिक घटना असून पुढील दोन ते तीन महिन्यात ही सिरम इन्स्टिट्यूटची लस उपलब्ध होईल, असेही डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले