नागपूर :
रिझर्व्ह बॅंकेकडून दोन हजार रुपयांच्या नोटा येण्याचे प्रमाण कमी झाल्याने बाजारातील या नोटा दिसेनाशा झालेल्या आहेत. एटीएममधूनही दोन हजाराऐवजी ५००, २०० आणि शंभर रुपयांच्या नोटा मिळत आहेत. बाजारातून हळूहळू दोन हजारांच्या नोटांची साठेबाजी तर केली जात नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. दोन हजारांच्या नोटा बाजारात दिसत नसल्याने अनेक तर्क वितर्कही काढले जात आहेत.
बॅंकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टांकसाळमध्ये दोन हजारांच्या नोटांची छपाई गेल्या काही महिन्यांपासून बंद झालेली आहे. त्यामुळे बॅंकेत दोन हजारांच्या नोटा येण्याचे प्रमाण पूर्णपणे बंद झालेले आहे. तसेच बाजारातून रिझर्व्ह बॅंकेकडे आलेल्या दोन हजारांच्या नोटा पुन्हा बाजारात पाठवण्यावरही निर्बंध आणलेले आहेत.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनीही लोकसभेत मागील दोन वर्षात देशात बाजारातून १ लाख १० हजार २४७ कोटी रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा कमी झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळेच बाजारात दोन हजाराच्या नोटांची टंचाई प्रखरतेने जाणवू लागली आहे. टाळेबंदीच्या पूर्वी दोन हजाराच्या नोटा एटीएममधून काही प्रमाणात निघत होत्या. त्यामुळे बाजारातही त्याचे चलन होते. आता मात्र, त्याचे प्रमाण अतिशय अल्प झालेले आहे. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमच्या बॅंकेत दोन हजाराच्या नोटा येणे बंद झालेले आहे. त्यामुळे एटीएममध्ये दोन हजाराच्या नोटा भरणे बंद केले आहे. त्यामुळे एटीएममधील रचना बदलण्यास सुरुवात केलेली आहे.
*२० रुपयांचे नाणे चलनात*
नोटाबंदीनंतर १०, ५०, १००, २००, ५०० आणि २ हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर आता केंद्र सरकारनं २० रुपयाचं नाणं चलनात आले आहे. येथील रिझर्व्ह बॅंकेत २० रुपयाचे नाणे मार्च महिन्यात आले होते. आता त्या नाण्यांचे वाटप करण्याचे आदेश आले असून राष्ट्रीयकृत बॅंकांना ते नाणे वाटप करणे सुरू केलेले आहे. टाळेबंदीच्या पूर्वीचं हे नाणे येथील बॅंकेच आले होते. टाळेबंदीमुळे बाजारातील उलाढाल मंदावल्याने नाणे वाटप थांबविले गेले असेल असे बोलले जात आहे.