केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे याचा ठाकरेंवर पत्रकार परिषदेत पलटवार
सिंधुदुर्ग
“मध्यावधी निवडणुकीसाठी युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती आलीय का? कशामुळे मध्यावधी निवडणुका घेणार? काही कारण असलं पाहिजे ना! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कारण सांगावं की, या कारणासाठी मध्यावधी निवडणूक होईल. ते काय ज्योतिषी आहेत काय ? त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून मध्यावधी निवडणुका घेतल्या जाणार का ? असे कधी होत नसते.त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावं, असं मला वाटत नाही. कारण अभ्यासू किंवा वैचारिक पद्धतीने त्यांनी मुद्दा मांडलेला नाही. घरबसल्या बोलायला काय? त्यांनी घराच्या बाहेर येऊन बोलावं”, असा घणाघात केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंनी केला.
*राणेंचां ऋतुजा लटकेंना सबुरीचा सल्ला*
दरम्यान,केद्रीय मंत्री नारायण राणे यांना अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत प्रश्न विचारण्यात आला. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय जवळपास निश्चत आहे. त्यामुळे लटके यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवरही टीका केलीय. त्यांच्या या टीकेवर नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणालेत “आधी जिंकून या, विजयी म्हणून शिक्कामोर्तब होऊ द्या, मग बोला. कधी काय बोलावं हे त्यांना अजून अवगत नाहीय. भाजपची मतं कुणाला पडली हे आम्ही आधी त्यांना पाठिंबा देऊन स्पष्ट केलं. आम्ही मध्येच लटकत नाहीत. आमचा निर्णय पक्का असतो. मी या पोटनिवडणुकीकडे गांभीर्याने पाहिलं नाही. कारण सगळ्याच पक्षांनी लटकेंना पाठिंबा दिलेला होता”, अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली.