पद्मश्री सौ. सुधा मूर्ती यांच्या हस्ते उद्घाटन
देवगड
स्व. अमृतराव राणे (माजी आमदार) यांच्या संकल्पनेतून साकार झालेली श्रीदेवी पावणादेवी कृपा शिक्षण विकास मंडळ आप्पा देऊ घाडीगावकर विद्यानगरी बापर्डे जुवेश्वर ता. देवगड ही शिक्षण संस्था गेली दहा वर्ष कार्यरत असून प्रगतीपथावर आहे. नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना 6वी ते 12 पर्यंतचा अभ्यासक्रम स्वयं अर्थसहाय्य तत्वावर चालवण्यास मान्यता मिळाली आहे. यानिमित्ताने संस्थेच्या यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा औपचारिक उद्घाटन सोहळा बुधवार दि 9 नोव्हेंबर रोजी बापर्डे येथे आप्पा देऊ घाडीगावकर विद्यानगरी प्रांगणात साजरा होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री सौ. सुधा मूर्ती (इन्फोसिस फाउंडेशन मूर्ती फाउंडेशन बेंगलोर), सीईओ प्रजित नायर, हृदयरोग तज्ञ जसलोक हॉस्पिटल मुंबईचे डॉ. सुरेश जोशी तसेच भारतीय नौदलातील अधिकारी यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमात सकाळी 9 ते 10 सत्यनारायणाची महापूजा 10 ते 12 सौ. सुधा मूर्ती व नौदलातील अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व गप्पागोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी 4.30 ते 8 वाजेपर्यंत उद्घाटन सोहळा व पाहुण्यांचे मार्गदर्शन सर्व ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांना होणार आहे.
डॉ. सुहास राणे प्रमुख मार्गदर्शक, बाबुराव राणे अध्यक्ष श्री देवी पावणा देवी कृ.शि.वि. मंडळ, श्री सुधीर नाईकधुरे अध्यक्ष बापर्डे जुवेश्वर प्रा.वि.मंडळ, श्री संजय लाड सरपंच बापर्डे ग्रामपंचायत, प्रसाद (अजय) नाईकधुरे खजिनदार व संदीप नाईकधुरे कार्यवाह यांनी बापर्डे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ शिक्षक व विद्यार्थी यांना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सौ सुधा मूर्ती यांची लोकप्रिय पुस्तके या कार्यक्रमात विक्रीस उपलब्ध असणार आहेत.