*जागतीकसाहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*ऋण माझ्या लेखणीचे…*
पाच सहा वर्षांची असेन मी, कापडण्याच्या घरात
भिंतीवर अबकड लिहिलेले,खिळ्याला टांगलेले कॅलेंडर मला
आताही दिसते आहे. माझे वडिल म्हणजे माझे प्रचंड
आदरस्थान ! फारसा वेळ त्यांना नसतांनाही पहिलीचे
वर्ष त्यांनी मला घरीच तयार केलं नि एकदम दुसरीत
गेल्याचे मी ऐकले आहे. कॅलेंडर व मी त्यांच्यजवळ
बसून शिकत असल्याचे मात्र चांगले आठवते आहे.
पहिले उपकार आपल्या आयुष्यात ह्या व्यक्तिंचे की
त्यांनी पहिल्यांदा आपल्या हातात पेन्सिल(खडूची)
दिली ! ती दिलीच नसती तर आजच्या ह्या सुमती पवार
दिसल्या असत्या का? नाहीच ! म्हणून प्रथम ऋण आपल्या
हाती लेखणी देणाऱ्याचे आहे मग ती आई असो, भाऊ असो
कुणी ही असो. म्हणजे पहा अगदी कळत नव्हते फारसे
तेव्हाच आपल्या हाती लेखणी आली? किती महान व
महत्वाची घटना आहे हो ही आपल्या आयुष्यातील !
अगदी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावी अशीच ना? अहो
हीच ती वेळ जिने प्रथम आपल्या आयुष्याला कलाटणी
दिली. बघताय् ना ? ज्यांच्या हाती लेखणी आली नाही
त्यांची कशी अवस्था झाली आहे ते ? म्हणून प्रथम आभार
मानू त्यांचे की ज्यांनी आपल्या हाती लेखणी देऊन आपल्याला
माणूस बनविले.
हो, लेखणी माणसाला माणूस बनवते.फार जुन्या काळात
अगदी अश्म युगात माणूस रानटी अवस्थेत होता. दगडाची
हत्यारे, ठिणगी पाडून जाळ निर्माण करणारा, त्यावर शिकार
भाजून खाणारा असा. हळू हळू संस्कृती निर्माण झाली ,
माणूस माणसा सारखा वागू लागला पण खरे संस्कार झाले
ते लेखन कला अस्तित्वात आल्यानंतर! श्रवणबेळगोळचा
शिलालेख हा त्याचा पहिला पुरावा आहे.त्या आधी “अक्षी”
येथिल पुरावा आहे तो प्रथम मानला जातो पण श्रवणबेळगोळचा शिलालेख जास्त गाजला. साधारणत:
पाचव्या सहाव्या शतकापासून मराठी बोलल्याचे व लिहायला
लागल्याचा अंदाज आहे. लिहायला व वाचायला आल्यानंतर
मात्र माणसाची झपाट्याने प्रगती झाली.त्यात पंधराव्या शतकात औद्योगिक क्रांति घडून आली व युरोप मध्ये प्रचंड
नवे शोध लागून युरोप आपल्या पाचशे वर्षे पुढे निघून गेला.
त्या उलट अंधश्रद्धांनी अजून आमची पाठ सोडली नाही. असो.
उत्तरोत्तर लेखणीची किमया लक्षात आली. ह्या लेखणीनेच,
युरोप मधील विचारवंतांच्या स्फोटक लेखांनी राजसत्ता उलथवून टाकल्या व स्वातंत्र्याची मागणी केली,न्यायाची
मागणी केली.आणि हळूहळू स्वातंत्र्याचा उद् घोष झाला.म्हणजे बघा सारे घडते ते लेखणी मुळेच ! आणि आज
मी लेखणी विषयी बोलते आहे तुमच्याशी, ती किमयाही
लेखणीचीच नाही काय? म्हणून मी म्हटले की माझ्या हाती
प्रथम लेखणी दिली त्या माझ्या वडिलांचे उपकार थोर आहेत.आणि मग हाती लेखणी आल्यानंतर माझी उत्तरोत्तर
प्रगतीच होत गेली. फारसा अभ्यास केला नाही तरी पास होत
गेले. व समज आल्यानंतर मात्र पिसाटा सारखे वाचले व त्याचाच परिपाक असेल कदाचित की १९९२ साली माझी
लेखणी स्वयंपाकाच्या ओट्यावरच दोन गंभीर कविता प्रसवली
व खुद्द मीच संभ्रमात पडले की मी हे काय बघते आहे?
मी नवलाईने त्या दोन बाळांना बघत राहले. “जीवन आणि झुला” अशा त्या दोन कविता होत्या.
आणि मग काय एखाद्या बाळाच्या हाती नवे खेळणे सापडावे
व त्याने त्याचाच पिच्छा पुरवावा तसे माझे झाले. या नव्या
खेळाने मला झपाटून टाकले व आपल्याला काही नवा शोध
लागला आहे हे पाहून मी त्यातच गुरफटून गेले, ते आजतगायत १९९२ ते २०२२, तो खेळ अखंडपणे चालूच
आहे. मी कधी काळी कविता लिहिल असे कोणी मला म्हणाले असते तर त्यालाच मी वेड्यात काढले असते पण
आज त्याच कवितेने मला प्रचंड वेड लावले असून तुमच्या
सारख्या शेकडो रसिकांशी माझे ऋणानुबंध जुळले आहेत
ही केवढ्या भाग्याची गोष्ट आहे.लेखणी क्रांतिकारकच आहे.
सर्व अर्थाने. लेखणी हे महा भयंकर धारदार शस्र आहे. दुधारी असे.कुठल्याही देशाचा स्वातंत्र्याचा इतिहास ह्या लेखणी शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. भारताचा स्वातंत्र्य लढा असो की,संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, ती ह्या लेखणीनेच
घडवली असे म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये इतका ह्या
लेखणीचा प्रभाव व सहभाग मोठा आहे.
ह्या लेखणीने तर माझे आयुष्यच पुर्ण बदलून टाकले आहे.तुम्हा रसिकांशी तर असे काही नाते जडले आहे की
तुम्ही चोविसतास मोबाईल मुळे माझ्या संपर्कात आहात .
आणि मला दिवसाचे चोविसतास कमी पडत आहेत एवढे
माझे काम वाढले आहे.तर मंडळी, मी आकंठ ह्या लेखणीच्या
कर्जात बुडाले आहे आणि अजून तरी माझा तिच्या ऋणातून मुक्त होण्याचा विचार नाही. किंबहुना मी तिच्या ऋणातच राहणे
पसंत करीन.
खूप खूप धन्यवाद मंडळी ..
लेखणीच्या प्रेमात मी …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: ४ ॲाक्टोबर २०२२
वेळ : दुपारी ११/५०