You are currently viewing रंगभूमी

रंगभूमी

*५ नोव्हेंबर रंगभूमी दिनानिमित्त जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…लालित्य नक्षत्रवेल…श्रीशब्द समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर यांची अप्रतिम काव्यरचना*

*रंगभूमी*

आज पुन्हा एकदा
उठून उभा रहा…नटसम्राट बनून
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर
पुन्हा एकदा लाव…खोटा खोटा रंग..
रंगवून…चमकवून टाक
काळवंडलेला.. गरिबीच्या झळांनी
पोळून गेलेला तुझा चेहरा
दूरवरून खुर्चीत बसून
लोक पाहतील तुझा हसरा चेहरा
तू हसत रहा..
तुझ्या अभिनयाने खिळवून ठेव प्रेक्षक
घाबरू नकोस..
दिसणार नाहीत त्यांना तुझे बोलके डोळे…
आणि त्या डोळ्यात तरारणारे भाव..
तुझ्या शब्दशब्दावर होईल
टाळ्यांचा कडकडाट…
लोक उठुनही उभे राहतील
बोटं तोंडात घालतील
शिट्ट्या मारतील…कर्णकर्कश..
तू मात्र अभिनयापासून भरकटू नकोस
खोलवर बुडवून घे स्वतःला
त्या भूमिकेत.
संवाद फेकीवर आवाज येतील..
कानावर…”वाह वाह…”
पोटातील भुकेने थरथरतील तुझे हात..
लोक जिवंत अभिनय समजून जातील
दिव्यांच्या प्रकाशात उजळेल..
चेहऱ्याचा रंग..
अंतरंग काळोखात असलं तरीही..
तू दडवून ठेव तुझ्या अंतरंगातील भावना
गाडून टाक त्यांना रंगभूमीवर चढताच..
एक कलाकार म्हणून..
ठाव घे प्रेक्षकांच्या हृदयाचा
तुझ्या हृदयातील दुःख दूर सारून
अन..
पुन्हा एकदा…
चेहऱ्याचा रंग धुवून धाव घे
खऱ्याखुऱ्या जीवनातील रंगभूमीकडे..
खरी जगण्याची कला दाखविण्यासाठी…

©[दिपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

This Post Has One Comment

  1. Alleluia Fernandes

    सुंदर कविता . खुप आवडली. कवीने सुंदर वाक्यात शब्दात गुंफून. रंगभूमीवर असलेल्या कलाकारांना मनाची ठाव घेणारी ही खुपच सुंदर

प्रतिक्रिया व्यक्त करा