सिंधुदुर्ग जिल्हाच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी क्रिकेटचे वेड पहायला मिळते. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वेगवेगळ्या स्पर्धा पार पडताना दिसत असतात. गेल्या जवळपास दोन वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्सीखेच स्पर्धा होताना दिसत आहेत, आणि मुख्य म्हणजे मंडप उभारून अगदी क्रिकेट स्पर्धेला ज्याप्रमाणे जोरदार तयारी केली जाते तशीच तयारी रस्सीखेच स्पर्धा आयोजनाला केलेली दिसून येत आहे, आणि जिल्ह्यातील लोकांचा देखील भरभरून प्रतिसाद मिळालेला दिसतो आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्सीखेच स्पर्धेला खऱ्या अर्थाने ग्लॅमर प्राप्त झाले आहे.
रस्सीखेच स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावातून पहिल्यांदा सुरुवात झाली. क्रिकेटच्या जमान्यात अशी स्पर्धा भरविणे हे देखील धाडस होते. परंतु तळवडे येथील स्पर्धा यशस्वितेनंतर गावागावातून रस्सीखेच स्पर्धा भरवल्या जात आहेत. यावर्षी तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शेजारील कोल्हापूर मध्येही रस्सीखेच स्पर्धा भरवली गेली आणि अभिमानास्पद गोष्ट म्हणजे अलीकडेच कोल्हापूर येथील रस्सीखेच स्पर्धेत वेंगुर्ला येथील शुभ्रा स्टार संघाने विजेतेपद पटकावले. या संघाचे अष्टपैलू खेळाडू न्हावेली येथील बंटी नाईक यांनी फ्रंट मॅन म्हणून प्रेक्षकांची मने जिंकली. बंटी यांच्या युक्ती बरोबर शक्तीच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघाने कोल्हापूर येथे विजेतेपद पटकावले.
जय हनुमान मित्रमंडळ (मळई) निवती आयोजित कु.चित्रांग देवदत्त साळगावकर पुरस्कृत खुली रस्सीखेच स्पर्धा २०२२ ही ०८ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्रौ ठीक ७.०० वाजता निवती पोलीस स्टेशनच्या मागे आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु.५०००/- द्वितीय रु.३००० व तृतीय रु.२०००/- ठेवण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे दिनांक ०६/११/२०२२ पर्यंतच प्रवेशिका स्वीकारल्या जाणार आहेत. इच्छुक संघांनी कृष्णा मार्गी ७४९८६०८२४२ / समीर परब ९४०४९३८५२८ / गुरू मार्गी ९३०७२४२९८७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टी-२० च्या जमान्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्सीखेच सारख्या आगळ्यावेगळ्या स्पर्धा आयोजित करून यशस्वी होत असल्याने आयोजकांचे कौतुक होत आहे.