राज्य पुरस्कृत शिक्षकांचे आगाऊ दोन वेतनवाढी पुरर्वत सुरु करावे
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात यावे
पुणे
राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध प्रश्न बाबत शिक्षण आयुक्त यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय राज्य पुरस्कार देऊन उत्तम शिक्षकांना शासनाने सन्मानित केले आहे परंतु या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या प्रश्नावर सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे वतीने माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन माननीय श्रीराम पानझडे साहेब उपसंचालक प्रशासन यांच्याकडे देण्यात आले. यावेळी राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर , राज्यकार्याध्यक्ष दशरथ शिंगारे ,राज्य सहसचिव माधव वायचाळ , राज्य प्रसिद्धीप्रमुख -सुनील गुरव ,पुणे विभागीय अध्यक्ष सतीश चिपरीकर, पुणे जिल्हाध्यक्ष भिमराव शिंदे , कोल्हापूर सरचिटणीस नवनाथ व्हरकट , पुणे जिल्हा पदाधिकारी शामराव इंदोरे उपस्थित होते .
निवेदनामध्ये राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना 2013 ते 2014 पासून पुढे दोन जादा वेतन वाढी देण्यात याव्यात. राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना ओळखपत्र देण्यात यावे. राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर विनाअट प्राधान्याने पदोन्नती देण्यात यावी. राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वार्षिक सर्वसाधारण बदल्यांमध्ये संवर्ग एक मध्ये समाविष्ट करण्यात यावे. शासन आदेशानुसार नेटसेट पीएचडी एम ए एज्युकेशन झालेल्या राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पदोन्नती मध्ये सामावून घेण्यात यावे. राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना बस व रेल्वे प्रवास सेवा मोफत देण्यात यावे. राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या विविध समित्यावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी.
सन 2020 पासून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण झालेले नाही ते लवकरात लवकर व्हावे. राष्ट्रीय राज्य व जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक अती उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांच्या बाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ज्यादा वेतनवादी मिळणे बाबत कार्यवाही व्हावी. जिल्हा परिषद शिक्षण विभागात राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या नावाचा बोर्ड लावण्यात यावेत. अशा विविध आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी आयुक्ताने मागण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले.