वैभववाडी प्रतिनिधी :
वैभववाडी तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. कोकिसरे, लोरे नं 2 या गावातील नुकसान झालेल्या भातशेतीची तहसीलदार रामदास झळके यांनी शनिवारी पाहणी केली. यावेळी मंडळ अधिकारी दीपक पावसकर, तलाठी एस.बी. सावंत, कोकिसरे गावचे ग्रामस्थ भालचंद्र जाधव, श्रीराम शिंगरे आदी उपस्थित होते.
कृषी विभागाच्या सर्वेनुसार वैभववाडीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास 35 ते 40 टक्के शेतीचे नुकसान झाले आहे. नदीकाठची बरीचशी शेती वाहून गेली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तात्काळ तलाठी, कृषी सेवक व ग्रामसेवक यांना देण्यात आले आहेत. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी त्वरित अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार झळके यांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी तहसील कार्यालय येथे तलाठी, ग्रामसेवक व कृषी अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. महसूल गाव निहाय नुकसानीचा पंचनामा करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेकडे विभागून देण्यात आली आहे. पंचनामा करण्याचे काम सुरू झाले आहे. तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन रामदास झळके यांनी केले आहे.