आईनेच स्वतःची किडनी देऊन दिला नव्याने जन्म
सावंतवाडी :
पूणे येथे वास्तव्यास असलेले विलास सखाराम नाईक हा युवक किडनी प्रत्यारोपण आजारावर उपचारासाठी कोरेगाव पार्क पुणे येथील एनलॅक्स अँड बुधराणी हॉस्पिटल, पुणे येथे उपचारासाठी दाखल झाला आहे.
कालांतराने प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर त्यांच्या मातोश्री अन्नपूर्णा सखाराम नाईक यांनी आपल्या विवाहित मुलाला किडनी दान केलेली आहे. मात्र पुढील वैद्यकीय खर्च हा त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना पेलवणारा नाही.
त्याची पत्नी पूर्वाश्रमीच्या विरांजली वनकर यांनी सौ.ज्योती तांडेल शाखा समन्वयक ११५ भांडुप यांच्या माध्यमातुन ईशान्य मुंबईच्या महिला विभाग प्रमुख राजश्री राजन मांदविलकर यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती दिली.
त्यानंतर, राजश्री मांदविलकर यांनी ईशान्य मुंबई विभाग प्रमुख व माजी आमदार अशोक पाटील यांची मागील आठवड्यात भेट घेऊन आजाराची माहिती दिली. त्यानंतर अशोक पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तात्काळ शिफारस पत्र देऊन शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्याशी त्वरित संपर्क साधला. तात्काळ मांदविलकर यांनी नाईक परीवारांना सोबत घेऊन सर्व कागदपत्रे जोडून मंत्रालयात मंगेश चिवटे यांना भेटल्या. राजश्री मांदविलकर यांनी मुख्यमंत्री कार्यालय व सहाय्यक संचालक व कक्षाशी सातत्याने पाठपुरावा केला.
अल्पावधीत सहाय्यक संचालक निधी व लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी २८ऑक्टोबर २०२२ रोजीच्या पत्रानुसार विलास नाईक यांना तात्काळ उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख रुपयांचा निधी हॉस्पिटलच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे स्वाक्षरीचे पत्र दिले.
यासाठी माजी आमदार अशोक पाटील, ईशान्य मुंबई महिला विभाग प्रमुख, राजश्री राजन मांदविलकर, भांडुप विभाग संघटक नेहा नंदकुमार पाटकर व ज्योती तांडेल यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच ही उपचारासाठी तातडीची मदत मुख्यमंत्री निधीतून करण्यात आली. विलास नाईक परिवाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अशोक पाटील व राजश्री मांदविलकर यांचे विशेष आभार मानले आहेत. विलास नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरने सांगितले.