दहा हजार कार्यकर्ते सहभागी होणार – आ. सतेज पाटील
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा दि. 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार असून, कोल्हापुरातील काँग्रेसचे 10 हजार कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रात येणारी ही पदयात्रा यशस्वी करण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केले. जिल्हा काँग्रेस कमिटी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते.
आ. पाटील म्हणाले, प्रत्येक तालुक्यातून भारत जोडो यात्रेसाठी किती कार्यकर्ते सहभागी होणार याची माहिती घेण्यात आली. महाराष्ट्रात 16 दिवस ही यात्रा चालणार आहे. दररोज 21 कि.मी. अंतर पार केले जाणार आहे. दि. 12 रोजी पहाटे सहा वाजता राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हिंगोली येथे पोहोचणार आहे. या ठिकाणी कोल्हापूरचे कार्यकर्ते यात्रेत सहभागी होणार आहेत. भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे आमंत्रण काँग्रेसकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले आहे. त्यामुळे या पदयात्रेच्या माध्यमातून देशभरातील दुभंगलेली मने एकत्र करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते राहुल गांधी करत आहेत. त्यामुळे या यात्रेमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना देखील सहभागी होतील, असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. प्रमुख नेत्यांची सुरक्षा व्यवस्थेला राजकीय रंग असता कामा नये. दुर्दैवाने काही घडले तर याची सर्वस्वी जबाबदारी राज्य शासनाची असेल, असेही ते म्हणाले. बैठकीला काँग्रेसचे सरचिटणीस गुलाबराव घोरपडे, चिटणीस सूर्यकांत पाटील-बुद्धिहाळकर, शशांक बावचकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, शशिकांत खोत, गोपाळराव पाटील, संजय वाईकर व कार्यकर्ते उपस्थित होते.