युवा नेतृत्व विकास अभ्यासक्रम शिबिराचे गोपुरी येथे उद्घाटन
कणकवली
युवापिढीला संविधानिक मूल्यांची माहिती असणे आणि त्यानुसार त्यांनी काम करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शासन प्रशासन कसे चालते याचा अभ्यासही युवकांनी करणे गरजेचे असून युवकांमध्ये याविषयी जागृती होण्यासाठी आयोजित करण्यात आलेले शिबीर एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे मत कणकवली नायब तहसीलदार टी. ए. रासम यांनी व्यक्त केले.
अनुभव शिक्षा केंद्र मुंबई व कोकण विभाग यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या युवा नेतृत्व विकास अभ्यासक्रम या शिबिराचे गोपुरी येथे श्री. रासम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी गोपुरी आश्रमाचे सचिव मंगेश नेवगे, अनुभव शिक्षा केंद्रचे राज्य समन्वयक सचिन नाचणेकर, अनुभव शिक्षा केंद्रच्या कोकण मुंबई विभागीय समन्वयक आसमा अन्सारी, अनुभव शिक्षा केंद्राचे रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रशिक्षक सहदेव पाटकर, अनुभव शिक्षा केंद्रचे जिल्हा प्रशिक्षक किशन, आरजू, दरशा, उषा, साना तसेच साद टीम कणकवलीचे सदस्य विशाल गुरव, अक्षय मोडक, सुजय जाधव, विल्सन फर्नांडिस, श्रेयश शिंदे आदी उपस्थित होते.
या शिबिरात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड या जिल्ह्यांतील १८ ते २९ या वयोगटातील २५ युवक युवतींचा समावेश आहे. युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्स या कोर्सच्या माध्यमातून युवक युवतींना स्वतःमध्ये नेतृत्व विकास करून शासन प्रशासनात सक्रियपणे सहभाग घेण्याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सोबतच सामाजिक माध्यमांची ओळख, प्रशासकीय यंत्रणा व त्यांचे कार्य, प्रत्यक्ष प्रशासकीय यंत्रणेला भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेणे, वस्ती, गाव विकासाचे घटक समजून घेणे, जनवकालत कशी करावी यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी या शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यावेळी गोपुरी आश्रमाचे सचिव मंगेश नेवगे यांनी शिबिराला शुभेच्छा देताना अशा समाजप्रबोधनात्मक कार्यासाठी गोपुरी आश्रमाची निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले. अनुभव शिक्षा केंद्रचे राज्य समन्वयक सचिन नाचणेकर यांनी शिबिराची माहिती देताना युवकांचा शासनातील आणि प्रशासनातील सहभाग तसेच संविधानिक मूल्यांची ओळख या शिबिराच्या माध्यमातून होणार असल्याचे सांगितले. अनुभव शिक्षा केंद्राच्या कोकण मुंबई विभागीय समन्वयक आसमा अन्सारी यांनी प्रस्तावना मांडली. तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अनुभव शिक्षा केंद्राचे रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रशिक्षक सहदेव पाटकर यांनी केले.