कणकवलीत रोटरॅक्ट क्लबच्या किलबिल कार्यक्रमाला प्रतिसाद
कणकवली
खेळ असो वा अन्य कुठलेही क्षेत्र असो, कठोर मेहनतीशिवाय पर्याय नाही. जिद्द आणि सातत्य ठेवल्यास निश्चित यश मिळू शकते, आणि स्वतः बरोबरच देशाचे नाव आपण उंचावू शकतो; असे प्रतिपादन युवा जलतरणपटू पूर्वा संदीप गावडे हिने कणकवली येथे आयोजित किलबिल कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना केले.
रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल तर्फे आयोजित दिवाळी विशेष कार्यशाळा उत्साहात पार पडली. कणकवली तालुक्यातील रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्यातर्फे किलबिल या दिवाळी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून जलतरणपटू पूर्वा गावडे लाभल्या होत्या.
कार्यशाळेची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीने झाली. यावेळी जलतरणपटू पूर्वा गावडे यांचा रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल तर्फे सत्कार करण्यात आला. कार्यशाळेसाठी ५२ मुले उपस्थितीत होती. आकाश कंदील बनविणे, पणत्यांना रंगकाम करणे, चित्रकला स्पर्धा, आयुर्वेदिक उटणे बनवणे, शुभेच्छापत्र बनवणे; अशा उपक्रमांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
मुलांनी खूप सुंदर असे आकाश कंदील बनविले होते. युरेका सायन्स क्लबच्या सौ. सुषमा केणी यांनी आयुर्वेदिक उटणे कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक दाखविले. तसेच निसर्गातल्या वनस्पतींचा वापर करून उटणे घरच्या घरी बनवू शकतो, हेही मुलांना त्यांनी सांगितले. मुलांचा सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम कार्यशाळेच्या वेळी घेण्यात आला. सुंदर कलांचा अविष्कार या कार्यशाळेत बघायला मिळाला.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष मा. समीर नलावडे, विद्यामंदिर हायस्कूल, एस एम हायस्कूल, आयडियल इंग्लिश स्कूल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, सेंट उर्सुला स्कूल यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यशाळेप्रसंगी रोटरॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल च्या अध्यक्षा रोट. श्रद्धा पाटकर सेक्रेटरी रोट. मिहीर तांबे रोट. अवंतिका कांबळे रोट. आकांक्षा कदम रोट. राजस परब उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन दीपक बेलवलकर, रोटरॅक्ट क्लब ऑफ बिर्ला कॉलेज चे अध्यक्ष मयुरेश शिरवडेकर, अनुभव शिक्षा केंद्र समन्वयक सहदेव पाटकर , नेहरू युवा केंद्र कणकवली समन्वयक अक्षय मोडक यांनी उपस्थित राहून कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या.