हजारोंच्या संख्येत सावंतवाडीकर उपस्थित
उत्सव कोणताही असो सावंतवाडीकर जनता त्याचा महोत्सव बनवते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला तो म्हणजे सावंतवाडी येथील नरकासुर स्पर्धेत….!
सावंतवाडीकर जनतेच्या अमाप उत्साहात सावंतवाडी येथील तलावाच्या काठावर नरकासुर स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. सावंतवाडीचे लोकप्रिय नाम.दीपक केसरकर यांनी देखील स्पर्धेच्या ठिकाणी भेट देत शुभेच्छा दिल्या. नरकचतुर्दशीच्या पूर्व रात्री दरवर्षी सावंतवाडीत नरकासुर स्पर्धा पार पडते. सावंतवाडी शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील नरकासुर स्पर्धेसाठी येतात. यावर्षीची स्पर्धा विशेष आकर्षक झाली. चितरआळीचा लक्षवेधी हालता आग ओकणारा नरकासुर, कुडाळ तालुक्यातून आलेला गरुडावर बसून श्रीकृष्ण सुदर्शन चक्र सोडतो आणि नरकासुर वध होत असलेला देखावा, माठेवाडा येथील अगडबंब हालता नरकासुर, गवारेड्यावर स्वार नरकासुर असे कितीतरी हालते, आग ओकणारे नरकासुर स्पर्धेसाठी आले होते. बालगोपाल मंडळ, महिला मंडळ यांचे छोटे नरकासुर देखील लक्ष वेधून घेत होते. तीन फुटांच्या नरकासुर पासून पंधरा वीस फुटांचे नरकासुर देखील स्पर्धेत आले होते. नरकासुर स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी तळ्याचा काठ गर्दीने फुलून गेला होता.