बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये किल्ले प्रतिकृती, दिवाळी फराळ, आकाश कंदील, पणत्या, ग्रीटिंग कार्ड यांचे प्रदर्शन
कुडाळ :
“शाळा – महाविद्यालये विद्यार्थ्यांची संस्कार केंद्रे आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांची विविध उपक्रमा मार्फत जोपासना केली जाते. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना प्रकाशात आणण्याचे काम शाळा महाविद्यालयांमध्येच खऱ्या अर्थाने केले जाते”, असे उद्गार बॅरिस्टर नाथ पै महिला व रात्र महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य अरुण मर्गज यांनी काढले. ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये दीपावली निमित्त आयोजित किल्ले प्रतिकृती, आकाश कंदील, दिवाळी भेट कार्ड, विविध दीपावली फराळांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्याना व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने नेहमीच नवनवीन उपक्रम राबवित असतात. संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांचे यासाठी नेहमीच प्रोत्साहन असते. हरहुन्नरी कलाशिक्षक प्रसाद कानडे, योगेश येरम व त्यांच्या सहकारी शिक्षकांच्या मदतीने व सर्व अभ्यासक्रमाच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे जे विद्यार्थ्यांच्या विविध कला कौशल्याचा कस लावणारे दीपोत्सवाचे प्रदर्शन भरविले जाते हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. सर्व पालक वर्ग या प्रदर्शनात सहभागी होतात ही अतिशय समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे. असे उपक्रम सर्व शाळा- महाविद्यालयांमध्ये रिबविल्यास विद्यार्थ्यांमधील कलाकार जागृत होऊन तो भविष्यात आपलं नाव रोशन करू शकतो. या उपक्रमात व प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे लहान मुलांच्या हस्ते फीत कापून व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बी.एड महिला महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे, सीबीएसई सेंटर स्कूलच्या प्राचार्य शुभांगी लोकरे, मधुरा ईन्सुलकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना भंडारी, प्रा. वैशाली ओटवणेकर, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला, डॉ. प्रगती शेटकर, बी.एड महाविद्यालयाच्या प्रा. योगिता शिरसाट व इतर मान्यवर, शिक्षक वृंद कर्मचारी विद्यार्थी सहभागी झाले होते. मुलांनी बनवलेल्या फराळांचा, पणत्या, ग्रीटिंग कार्ड, पतंग, आकाश कंदील अशा दीपावली प्रदर्शनरूपी जत्रेचा विद्यार्थ्यांनी व पालकांनी मनमुराद आनंद लुटला.