You are currently viewing विशाल मित्र मंडळाचे रूपांतर आता “विशाल सेवा फाउंडेशन” मध्ये.. 

विशाल मित्र मंडळाचे रूपांतर आता “विशाल सेवा फाउंडेशन” मध्ये.. 

भाजपा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांची घोषणा

सावंतवाडी :

 

गेली १५ वर्षे विशाल मित्र मंडळातून सामाजिक क्षेत्रात विशाल परब यांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना जनतेचा भरपूर प्रतिसाद लाभला. आता याच विशाल परब मित्रमंडळाचे रूपांतर “विशाल सेवा फाऊंडेशन” मध्ये करत आहे, अशी माहिती भाजप युवा नेता विशाल परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुक्यामध्ये रखडलेली विकास कामे, नवे विकासाचे प्रकल्प आणि बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. ग्रामीण भागातील लोकांना काम मिळावं यासाठी आपण या फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे विशाल परब यांनी सांगितले.

फाउंडेशनची स्थापना करताना अधिकृत रित्या रजिस्टर नोंदणी करून सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर फाउंडेशन चे कार्य टाकण्यात येणार आहे. कार्य करण्यासाठी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेणार आहे. वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमांना जनतेने भरभरून दाद दिली. त्याबद्दल आपण जनतेची नेहमीच ऋणी आहोत. तसेच अलीकडेच आपण कातकरी समाजाच्या 62 मुलांना दत्तक घेतले असून त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च व इतर आवश्यक सर्व मदत आपण करणार आहोत. जिल्ह्यात यापुढेही फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना बंद पडलेले विकासात्मक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्ही परिश्रम घेणार आहोत.

त्याचबरोबर वेंगुर्ला येथे मच्छीमार बांधवांसाठी मत्स्य महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी आवश्यक असलेले पंचतारांकित हॉटेल उभारले जात आहे. परंतु जे उद्योजक आहेत त्यांना हे प्रकल्प उभारताना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये वीज, पाणी रस्ते आधी प्रश्नांच्या समावेश आहे. त्यामुळे हे प्रश्न सोडवण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. तसेच क्रीडा क्षेत्रात काम करताना या ठिकाणी आयपीएलच्या धरतीवर जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात विविध स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.

सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा आंजिवडे घाट रस्ता मार्गी लावण्यासाठी आपण केंद्रीय व राज्यस्तरावर पाठपुरावा करणार आहोत. तर प्रसंगी या प्रश्नांवर आवाजही उठवला जाईल. शेतकरी बांधवांसाठी कार्य करताना आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना शेती अवजारे पुरवली जाणार आहे. माणगाव सारख्या ठिकाणी होऊ घातला वेंकीज प्रकल्प काही कारणास्तव रखडला होता. परंतु येणाऱ्या काळात हा प्रकल्प मार्गी लावला जाणार आहे. यातून तब्बल दहा हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. एकूणच विशाल फाउंडेशन चा उद्देश जनतेसाठी झटणे हाच राहील असे विशाल परब यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत विशाल परब यांच्या समवेत दादा साईल, विनायक राणे, प्रसन्ना देसाई, ॲड. बावकर, देवेंद्र सामंत, तेजस माने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा