You are currently viewing शासकीय धान (भात) खरेदी विक्रीसाठी 41 नोंदणी केंद्रे सुरु

शासकीय धान (भात) खरेदी विक्रीसाठी 41 नोंदणी केंद्रे सुरु

10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी

 धान विक्री शेतकऱ्यांनी हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री करावयाची आहे. ज्या शेतकऱ्यांना धान विक्री करणार आहे, त्यांनी खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात यावी, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी, ए.एस. देसाई यांनी दिली.

जिल्ह्यात 41 ठिकाणी धान (भात) विक्री नोंदणी केंद्रे सुरु करण्यात आली असून, यापूर्वी नोंदणीसाठी शुक्रवार दि. 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि धान विक्री नोंदणीसाठी शेतकऱ्यांना पुन:श्च गुरुवार दि. 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्य शासनाच्या आधारभूत किंमत धान खरेदी योजनेसाठी दि महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन लि. ही संस्था राज्य शासनाची मुख्य अभिकर्ता म्हणून ही संस्था खरेदीचे काम पाहत आहे. सन 2022-23 मध्ये शासनाच्या सूचनेनुसार खरीप पणन हंगामासाठी शासनाचे एफ.ए.क्यु प्रतीच्या धान (भात) करिता 2 हजार 40 प्रती क्विंटल दर जाहीर करण्यात आला आहे.

धान (भात) खरेदी शासनाच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे नोंदणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने  प्रत्येक केंद्राकरिता स्वतंत्र आयडी तयार करुन संस्थांना दिलेला आहे. नोंदणीसाठी चालू खरीप हंगाम सन 2022-23 मधील धान (भात) पीक लागवडीची नोंद असलेला डिजिटल स्वाक्षरीचा मूळ सातबारा प्रत, आधारकार्ड व बँक पासबुकाची झेरॉक्सप्रत इत्यादीची कागदपत्रांची आवश्यकता आहे. ही कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी. यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना एस.एम.एस.व्दारे नोंदणी क्रमांक दिला जाणार आहे. भविष्यात शासनाकडून धान (भात) खरेदीच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एस.एम.एस. व्दारे खरेदीसाठी बोलविण्यात येईल. शेतकऱ्यांच्या मालाची प्रतवारी तपासून शासनाने ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे प्रत्यक्ष धानाची खरेदी करण्यात येईल व खरेदी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर खरेदीची रक्कम वर्ग करण्यात येईल.

             यासाठी पुढीलप्रमाणे तालुकावार नोंदणी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. सावंतवाडी तालुका- खरेदी विक्री संघ लि. मार्फत सावंतवाडी,मळगाव,मळेवाड, मडुरा, डेगवे, कोलगाव, इंन्सुली, तळवडे, भेडशी.  कुडाळ तालुका- खरेदी विक्री संघ लि. मार्फत कुडाळ, कसाल, माणगाव, घोडगे,निवजे, आंब्रड, पिंगुळी, पणदूर, कडावल, तुळस, वेताळबांबार्डे, गोटोस, निरुखे. कणकवली तालुका- शेतकरी तालुका खरेदी विक्री संघ लि. कणकवली मार्फत कणकवली, लोरे नं.1, फोंडा, घोणसरी, सांगवे. वेंगुर्ला तालुका- खरेदी विक्री संघ लि. मार्फत वेंगुर्ला व होडावडा. देवगड तालुका- खरेदी विक्री संघ लि. मार्फत देवगड, पडेल, पाटगाव. मालवण तालुका- खेरदी विक्री संघ लि. मार्फत पेंडूर, गोठणे, विरण, मालवण. वैभववाडी तालुका- खरेदी विक्र संघ लि. मार्फत वैभववाडी, करुळ. आणि सिंधुदुर्ग जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सह. संघ लि. मार्फत ओरोस, कट्टा,मसुरे  अशा एकूण 41 केंद्रावर नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे.

तरी ज्या शेतकऱ्यांना शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर धान (भात) विक्री करावयाची आहे. अशा शेतकऱ्यांना नोंदणीकरिता शासनाकडून पुन:श्च गुरुवार दि. 10 नोंव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सातबारा मिळण्याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास तहसिल कार्यालय, तलाठी कार्यालय, तालुका खरेदी विक्री संघ, जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन दि- महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा