इचलकरंजी : –
महापालिकेचा दर्जा मिळाल्याने येथून पुढे इचलकरंजीतील सर्व शाळा, ज्युनिअर कॉलेजेस यांना सरळ जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होता येईल. अशा स्पर्धातून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण होतील आणि या कार्यासाठी महानगरपालिका प्रशासन सदैव तुमच्या पाठीशी राहून सर्वतोपरी साहाय्य करेल राहील असा विश्वास इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिला.
सन 2022-23 या सालातील शालेय शासकीय क्रीडा स्पर्धा नियोजन बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कोल्हापूरचे जिल्हाक्रीडाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. स्वागत राजर्षी शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि इचलकरंजी महापालिकेचे क्रीडा अधिकारी शंकर पोवार यांनी केले. नवीनच स्थापन झालेल्या महापालिका क्षेत्रातील शालेय शासकीय क्रीडा स्पर्धा सर्व क्रीडा शिक्षकांच्या सहकार्याने आणि महापालिकेच्या पाठींब्याने अत्यंत नेटकेपणाने व व्यवस्थितपणे पार पाडू” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हातकणंगले तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. शेखर शहा यांनी इचलकरंजीमध्ये जवळपास सर्व खेळांसाठी तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध असून विविध खेळ खेळून राज्य-राष्ट्रीय पातळीवर जाणाऱ्या खेळाडूंची संख्याही मोठी आहे. महापालिकेच्या निर्मितीमुळे येथील खेळाला आणखीन चालना मिळेल” असे सांगितले. जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. साखरे यांनी इचलकरंजीत विविध खेळांच्या पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय नेहमी तत्पर असेल असे आश्वासन दिले. उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी इचलकरंजीच्या क्रीडा क्षेत्राला मोठी परंपरा लाभली असून, येथे विविध खेळ उत्कृष्टपणे खेळले जातात असे सांगितले. यातून जे खेळाडू पुढे येतील त्यांना महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अहमदाबाद येथे झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य योगासन संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्य करणारे इचलकरंजीचे प्रा. सुहास पोवळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. योगासन खेळामधून महाराष्ट्राला सहा सुवर्ण व दोन रौप्य पदके मिळवून देण्यामध्ये पोवळे यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
महाराष्ट्राच्या योगासन संघातील दोन खेळाडूंना प्रशिक्षण देणारे इचलकरंजीचे योग प्रशिक्षक निलेश कागीनकर यांचाही सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खो-खो या खेळासाठी टेक्निकल ऑफिशियल म्हणून कार्य केलेले श्री संभाजी बंडगर सर यांचाही सत्कार करण्यात आला.याप्रसंगी उपायुक्त प्रदीप ठेंगल, सह आयुक्त केतन गुजर, नगर सचिव विजय राजापुरे, जिल्हा क्रीडा कार्यालयातील सचिन चव्हाण, सुधाकर जमादार, बालाजी बरबडे, रवी कुमठेकर, रोहिणी मोकाशी, संदीप जाधव, गौरव खामकर, महापालिकेचे सहायक क्रीडा अधिकारी संजय कांबळे, क्रीडा पर्यवेक्षक सचिन खोंदरे, आकाश माने, शूटिंग बॉलचे राष्ट्रीय खेळाडू साठे, क्रीडाशिक्षक विजय गुरव, मोहन वीरकर, विश्वास माने, डॉ. राहुल कुलकर्णी, नंदराज पवार, भिकाजी माने, गणेश बरगाले, गजानन लवटे, आनंदा बंडगर, रफिक मांगुरे, रमेश चौगुले, मलिक मणेर,बमित कागले, रवि चौगुले, तुषार जगताप, डॉ. राहुल कुलकर्णी उपस्थित होते.