*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*वसुबारस*
महाराष्ट्रात दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस.
गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादशीस हा
हा दिवस साजरा केला जातो.
हिंदु धर्मात गाईला अत्यंत मानाचे स्थान आहे.तिला गोमाता असेच संबोधले जाते .वसुबारसच्या दिवशी गाईची तिच्या पाडसासहीत प्रेमभावे पूजा केली जाते.
घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणूनही सवत्स धेनुचे सन्मानाने पूजन केले जाते.
वसु म्हणजे द्रव्य.धन. तिचे बारस म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात.
घर अंगणात दिवे लावून अंध:कार दूर करणारा ,अज्ञात मृत्युचे भयनिवारण करणारा ,आशा आकांक्षा बाळगणारा हा आल्हाददायक सण आहे.
वसुबारसच्या दिवशी सुवासिनी ,सायंकाळी एकभुक्त राहून सवत्स धेनुची पूजा करतात.
मुख्यत्वे हा शेतकर्यांचा सण आहे.आपला देश कृषीप्रधान असल्यामुळे ,पशुधन हे फार मोलाचं मानलं जातं.गाई वासरं असलेल्या घरात या दिवशी घरातल्या सुवासिनी,त्यांच्या पायावर पाणी घालतात.हळद कुंकु फुले वाहतात.गळ्यात फुलांच्या माळा घालतात.केळीच्या हिरव्यागार पानावर पुरणपोळीचा घास भरवतात.
या पूजनामागे कृतज्ञतेची भावना असते.चराचराविषयी
आपुलकी व्यक्त होते,भूतदयेचाच हा एक अविष्कार आहे.मूळात आपल्या सगळ्याच सणांचा अधिदाता निसर्ग आहे.म्हणून हे निसर्गपूजनही आहे…
दिवाळीच्या दरम्यान वातावरणात उर्जा निर्माण होते.काहीशी अस्थिरता असते.असे मानले जाते की
शतकोटी देवतांचा वास गाईच्या उदरांत असतो.गायीमधे दैवी किरण शोषण्याची क्षमता असते.ती कृष्ण स्वरुपात प्रभुचे प्रतिनिधीत्व करते म्हणून ही उपासना आहे…
थोडक्यात आपण या निमीत्ताने निसर्गाशी असलेलं
नातं जपतो…
ब्रह्मांड तत्व जाणून डोळसपणे पूजन करण्याचाच हा दिवस…..
सौ, राधिका भांडारकर.पुणे.