जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान वितरण सुरू
ओरोस
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या प्रोत्साहन अनुदान वितरणाचा शुभारंभ केल्यानंतर पुढील काही मिनिटांत जिल्ह्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली. एकट्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ६ हजार ९४० खातेदारांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली. यामुळे गेले तीन वर्षे प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हास्तरावर या वितरणाचा कार्यक्रम सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँक प्रधान कार्यालयात पार पडले.
पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांतील ज्या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे, त्यांच्या बँक खात्यात आज प्रोत्साहन रक्कम जमा करण्याचा शुभारंभ राज्यस्तरावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यासाठी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, आ नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक मंगेश सांगळे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, बँक संचालक विठ्ठल देसाई, संदीप सावंत, बाबा परब, प्रकाश मोर्ये, प्रज्ञा ढवण, प्रकाश बोडस, गजानन गावडे, महेश सारंग, विद्याप्रसाद बांदेकर यांच्यासह लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्या यादीत पात्र ठरलेल्या १२ हजार ८४२ पैकी १२ हजार २४ लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. त्यामुळे एवढ्या लाभार्थ्यांच्या खात्यात प्रोत्साहन अनुदान रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून यातील बहुतांश लाभार्थ्यांचे पैसे जमा झाले आहेत. यावेळी आ नितेश राणे यांच्यासह सर्व उपस्थितांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले.