You are currently viewing नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ वितरणाचा शुभारंभ

नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ वितरणाचा शुभारंभ

सिंधुदुर्गातील कर्जमाफी योजनेतील प्रत्येकी पन्नास हजार रु. प्रमाणे ६२४० शेतकर्‍यांचे १८ कोटी ५४ लाख बँक खात्यात जमा!

 

सिंधुदुर्गनगरी :

 

भाजपच्या नेतृत्वाखालील शिंदे व फडणवीस सरकारने भाजप सरकार सत्तेत असताना नियमित कर्जफेड करणार्‍यां शेतकर्‍यांना कर्जमाफीचा फायदा मिळाला नसला तरी प्रोत्साहन अनुदान देऊ अशी घोषणा केली होती व त्याची पूर्तता आता केली आहे. जनतेला जो शब्द देतो त्याची पूर्तता करणारे आमचे सरकार असून हा विश्वास शेतकर्‍यापासून सर्वसामान्य जनतेला आहे. शेतकर्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी आपण व आपले सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही आमदार नीतेश राणे यांनी या प्रोत्साहन अनुदान वितरण कार्यक्रमात बोलताना दिली.

विशेष म्हणजे सिंधुदुर्गातील ६२४० शेतकर्‍यांचे १८ कोटी ५४ लाख ऑनलाईन पध्दतीने राज्यस्तरीय कार्यक्रमा दरम्यान राज्य सरकारने आत्ताच वर्ग करत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले हा योगायोग नसून राज्य सरकारची कर्तबगारी व विश्वासार्हता आहे असेही आम नीतेश राणे यांनी स्पष्ठ केले.

नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ वितरणाचा शुभारंभ गुरुवारी मुंबई मंत्रालयामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होतानाच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने या योजनेत पात्र ठरलेल्या ठरलेल्या जिल्ह्यातील ७० शेतकऱ्यांच्या उपस्थितीत बँकेच्या सभागृहात एक शानदार सोहळा संपन्न केला.

आम नितेश राणे, जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. त्यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्हात जवळपास २७ हजार शेतकरी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानास पात्र ठरले आहेत. सन २०१९ यामध्ये भाजप सेना युतीच्या सरकारच्या काळात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना शासनाने जाहीर केली हाेती नंतरच्या सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही.

मात्र भाजपच्या नेतृत्त्वाखाली शिंदे फडणवीस सरकार येताच या योजनेची तातडीने अंमलबजावणी झाली. प्रामाणिक शेतकर्यांना प्रोत्साहनपर अनुदानाच्या वितरणाचा कार्यक्रमही संपन्न झाला याबद्दल आमदार नीतेश राणे यांनी आमचे सरकार शब्द पाळणारे सरकार असून शेतकऱ्यांचा व जनतेचा विश्वास असलेले सरकार आहे असेही स्पष्ट केले.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी आपल्या मनोगतात सरकारचा आधार घेऊन जिल्हा बँक सर्वसामान्य जनतेसाठी काम करत आहे. या बँकेमार्फत शेती कर्जाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली असून सरकारने दिलेल्या उद्दिष्टाच्या पुढे ही बँक काम करीत आहे. शेतकऱ्यांबरोबरच महिलांच्या उन्नतीसाठी जिल्ह्यातील बचतगटांच्या प्रगतीसाठी जिल्हा बँकेने ठोस पाऊल उचलले आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात नारी शक्तीला बळ देण्यासाठी प्रशासनाने महिलांसाठी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत व जिल्हा बँकेला एकूण पाच कोटी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले होते. मात्र एकट्या सिंधू जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील ८०५ महिलांना ६ कोटी ४५ लाखाचे कर्ज वितरण करत उद्दिष्टाच्या कितीतरी पटीने काम केले आहे. हे जिल्हा बँकेसाठी व जिल्ह्यातील महिलांसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचेही मनिष दळवी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते या बँकेतील ज्या महिला अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन बैलांचे जास्तीत जास्त कर्ज प्रस्ताव मंजूर केले त्या महिला अधिकाऱ्यांचा पैठणी देऊन सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील अनुदान वितरणाचे पहिली यादी जिल्ह्यातून अपलोड झाली असून त्यानुसार हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. शेतकर्यांचे आधार प्रमाणीकरण व तांत्रिक बाबी पूर्ण करून दुसरी यादीही अपलोड होईल व सर्व पात्र शेतकर्यांचे पन्नास हजार रुपयांचे अनुदान त्या त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल असे यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी जाहीर केले.

मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या उपस्थितीत या कर्जमाफी योजनेतील प्रोत्साहन अनुदानाचा वितरण सोहळा संपन्न झाला व तो जिल्हा बँकेच्या सभागृहात व्हिडीओ कॉन्फरन्सने जोडला गेला होता. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक बँकेचे अधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा