वैभववाडी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने राज्यातील दारिद्र रेषेखालील बीपीएल व अंत्योदय योजनेतील रेशनकार्ड धारकांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त शंभर रुपयात रवा, चणाडाळ, साखर हे प्रत्येकी एक किलो व एक लिटर पामतेल पिशवी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करुन ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाशाखेने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे मेलव्दारे अभिनंदन केले आहे. या संदर्भात ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. दोन अडीच वर्षे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवाळी सारखे सण उत्सव साजरे करता आले नाहीत. या काळामध्ये अनेकांच्या घरातील कर्त्या पुरुषांचे निधन झाल्याने उपजीविकेचे कोणते साधन राहिले नाही. मात्र शासनाच्या या निर्णयाने सर्वसामान्य कुटुंब, मजूर, कारागीर, फेरीवाले व शेतकरी याना शंभर रुपयात या वस्तू मिळणार असल्याने त्यांची दिवाळी गोड होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील लाखो रेशन धारकांना याचा फायदा होणार आहे.
रेशनिंग धान्य दुकानदार यांच्याकडून संबंधित लाभार्थी व्यक्तीला हे पॅकेज मिळेल याची काळजी संबंधित विभागाने घेतली पाहिजे. तसेच सर्व लाभार्थ्यांनी याचा जागरूकतेने लाभ घेतला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा उद्देश यशस्वी होईल असे ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील, उपाध्यक्ष श्री. एकनाथ गावडे, संघटक श्री.सिताराम उर्फ दादा कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी म्हटले आहे.