दिवाळी पूर्वी कर्मचाऱ्यांना पगार द्या..अन्यथा रुग्णालयाला टाळे ठोकण्याचा मनसेचा इशारा..
कुडाळ
कुडाळ महिला व बाल रुग्णालयावर कोट्यावधी रुपये खर्चून देखील अद्याप विविध समस्यांच्या गहरतेत अडकलेलेच दिसून येते. रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदारांनी जुलैपासून पगार दिला नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे शिस्तमंडळाने आज याबाबत वैद्यकीय अधीक्षकांना जाब विचारत धारेवर धरले. पगार नसल्याने मानसिक त्रासामुळे कर्मचाऱ्यांच्या हातून काही चुकीचं घडल्यास जबाबदार कोण,दिवाळीपूर्वी पगार होणार ह्याची शाश्वती आपण देणार का, नैराश्यातुन कर्मचाऱ्याने काही चुकीचं पाऊल उचलल्यास कोण जबाबदार अशा असंख्य प्रश्नांचा भडीमार केला.
रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉक्टर श्रीमती सुशांता कुलकर्णी यांनी कर्मचाऱ्यांचा पगार आपल्या अधिकारातील बाब नसल्याने आपण देखील कोल्हापूर आरोग्य उपसंचालकांशी मागील दोन महिन्यात याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. पुरवठादार कंपन्यांचे झालेल्या करारपत्रात कामगार विषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे करारबद्ध असून तुमच्या पत्रांना ठेकेदार किंमत दवत नसतील तर संबंधित ठेकेदारांचे ठेके रद्द करण्याबाबत का पत्र दिले गेले नाही असा उलट प्रश्न मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केला. कर्मचाऱ्यांचा पगार थकवून त्यांना कंटाळून राजीनामे देण्यापर्यंत परिस्थिती निर्माण करायची व नंतर कोल्हापूर येथील आपले नातेवाईक शेजारी नव्याने भरती करायचे असा सुप्त हेतू रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांचा असल्याचा आरोप मनसेने केला.
याच भरतीवेळी कर्मचाऱ्यांकडून भरतीवेळी आगाऊ तीन महिन्यांचा पगार उकळल्याचे प्रकरण चौकशी जन्य असताना त्याच स्थानिक कर्मचाऱ्यांची पगाराविना चाललेली पिळवणूक अधिकारी व ठेकेदार यांच्या सनगंमतानेच चालू असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
तद्नंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करीत तात्काळ करारातील अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी कारवाईचा प्रस्ताव उपसंचालकांकडे करण्याची मागणी केली. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा कंपनीने पगार अदा न केल्यास मनसे रुग्णालयाला टाळे ठोकेल असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,माजी तालुकाध्यक्ष बाबुल गावडे,उपतालुकाध्यक्ष सत्यविजय कविटकर, विभाग अध्यक्ष रामा सावंत, शाखाध्यक्ष वैभव धुरी आदि पदाधिकारी उपस्थित होते.