You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ विविध कार्यक्रमांनी साजरा

वैभववाडी महाविद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ विविध कार्यक्रमांनी साजरा

वैभववाडी

येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित, आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. १५ ऑक्टोबर हा एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन सर्वत्र ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. “वाचन प्रेरणा दिना” निमित्त वैभववाडी महाविद्यालयामध्ये प्रतिमा पूजन, दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन व स्पंदन विभागाच्या वतीने भित्तीपत्रकाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ.एन.व्ही. गवळी होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा.ए.एम.कांबळे, प्रा.एस.एन. पाटील, ग्रंथपाल श्री.किशोर वाघमारे, प्रा.डॉ.आर.एम.गुलदे, प्रा.राहूल भोसले, प्रा.डॉ.एम.ए.चौगुले, प्रा.एस.आर.राजे, प्रा.व्ही.सी. काकडे व प्रा.डॉ.अजित दिघे उपस्थित होते.
एपीजे अब्दुल कलाम यांनी विद्यार्थीदशेमध्ये खूप कष्ट घेतले.अनेक अडचणीवर मात करून आपले स्वप्न पूर्ण करुन शेवटी ते भारताचे राष्ट्रपती झाले.अब्दुल कलामांचे जीवनकार्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे असे ग्रंथपाल श्री.किशोर वाघमारे यांनी व्यक्त केले.
एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यावरून कलाम यांच्या महान कार्याची कल्पना येते. भारताचे एक थोर शास्त्रज्ञ तसेच भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी केलेली कामगिरी महत्त्वपूर्ण अशी आहे. त्यांनी पाहिलेले भारत महासत्तेचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. अशा महान व्यक्तींची चरित्रे समाजाला प्रेरणादायी असतात असे इतिहास विभाग प्रमुख प्रा.श्री. एस.एन.पाटील यांनी सांगितले.


आपला इतिहास,आपली संस्कृती व आपल्या परंपरा समजून घेण्यासाठी वाचन केले पाहिजे. ‘वाचाल तर वाचाल’ या म्हणीप्रमाणे विविधांगी वाचन केले पाहिजे. विद्यार्थी दशेमध्ये पुस्तकांना मित्र बनवून वाटचाल केल्यास जीवनात यशस्वी होता येते असे अध्यक्षीय भाषणात डॉ.एन.व्ही.गवळी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सुरुवातीला डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सांस्कृतिक विभाग सदस्य प्रा.राहुल भोसले यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, इतिहास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा