मुंबई
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंदिरे सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रावरुन राजकारणात एकच खळबळ उडाली होती. तेव्हाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ.अमृता फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर अमृता फडणवीस यांना शिवसेना महिला आघाडीने प्रत्युत्तर दिले होते. यानंतर आता पुन्हा अमृता फडणवीस यांनी ट्विट करत ठाकरे सरकारला शेरो शायरीच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
“मेरे पास ना घर न द्वार, फार क्या उखाडेगी बुलडोझर सरकार?” असे म्हणत अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन राज्य सरकारवर टीका करणाऱ्या कंगना रणौत च्या अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने बुलडोझर चालवले होते. त्यावरुन कंगनाने राज्य सरकारला बुलडोझर चालवणारी सरकार असे संबोधले होते. तोच मुद्दा पकडून अमृता फडणवीस यांनी टीका केल्याचे दिसत आहे.
नेमकं प्रकरण काय ?
मंदिरे सुरु करण्यावरुन अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत ‘वाह प्रशासन ! बार आणि दारूची दुकाने सुरु आहेत. मग मंदिरे डेंजर झोन आहेत का? काही जण नियमावली लागू करण्यात असमर्थ ठरतात, त्यावेळी त्यांनी प्रमाणपत्राची आवश्यकता असते,’ अशा खोचक शब्दांत टीकास्त्र सोडलं होत.
त्यावर मुंबई महापालिकेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी अमृता यांचा एकेरी उल्लेख करत ‘ती कोण आहे? आमदार, खासदार, नगरसेविका आहे का? ती कधी राजकारणात आली? नवरा मुख्यमंत्री झाल्यानंतर ती बोलू लागली,’ असे म्हणत, ‘शिवसेनेची राजकारणातली ही चौथी पिढी आहे. उगाच प्राणी वगैरे म्हणून टीका करु नका. आम्ही संस्कृती जपतोय. आम्ही जर तोंड उघडलं तर तोंड लपवायला जागा राहणार नाही,’ असे प्रत्युत्तर अमृता फडणवीस यांना देण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा अमृता फडणवीस यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर खरमरीत टीका करतच या धमकीला सडेतोड उत्तर दिलं आहे.
‘मेरे पास ना घर न व्दार, फिर क्या उखाडेगी बुल्डोजर सरकार ?’
कंगना प्रकरणी केलेल्या थिल्लर उतावीळपणाने आधीच जनमानस आणि कोर्ट या दोन्ही ठिकाणी अडचणीत आलेल्या शिवसेनेला हा वार चांगलाच वर्मी लागला असेल यात शंकाच नाही!