विनायक राऊत यांची माहिती
कणकवली
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेले आमदार, खासदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी यांच्यावर सरकारने सुडाची कारवाई सुरू केली आहे. यात आमदार वैभव नाईक यांची एसीबीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी तसेच आमदार श्री.नाईक यांना समर्थन देण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीतील पक्षांच्या वतीने कुडाळ येथील एसीबी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. मंगळवारी १८ ऑक्टोबरला हा मोर्चा कुडाळ शिवसेना कार्यालयाकडून सकाळी ११ वाजता निघेल अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
येथील विजय भवन येथे श्री.राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह अतुल रावराणे, प्रदीप बोरकर, सतीश सावंत, अरूण दुधवडकर, गौरीशंकर खोत, राजू शेट्ये आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.राऊत म्हणाले, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर, नेत्यांवर सूडाने कारवाई सुरू केली आहे. एकही गुन्हा नोंद नसलेले शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक विजय साळवी, तर गेली पाच वर्षे पोलीस संरक्षणात असलेले मुंबईतील नगरसेवक विजय तडवी आदींना हद्दपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
राऊत म्हणाले, भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारने आतापर्यंत ईडी, सीबीआय, आयटी आदी यंत्रणांचा विरोधकांना त्रास देण्यासाठी वापर केला. आता अन्टी करप्शन ब्युरो ही यंत्रणा कामाला लावली आहे. या यंत्रणेकडून आमदार वैभव नाईक यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र त्यांनीही कितीही चौकशी केली तरी त्याचा नाईक यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही. तसेच शिवसेना पक्षही अशा कारवाईंना घाबरणार नाही. मात्र या प्रवृत्तीचा आम्ही लोकशाही मार्गाने निषेध करणार आहोत. प्रसंगी न्यायालयातही दाद मागणार आहे.
आमदार वैभव नाईक यांच्यावर सुरू केलेल्या कारवाईचा निषेध आणि आमदार श्री.नाईक यांना समर्थन देण्यासाठी सिंधुदुर्गातील सर्व जनतेला सोबत घेऊन आम्ही मंगळवारी १८ ऑक्टोबरला कुडाळ येथील एसीबी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत. यात सर्व पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनतेने सहभागी व्हावे असेही आवाहन श्री.राऊत यांनी केले.