कणकवली :
महसूल विभागाकडून गेले काही दिवस ई – पीक पाहणी करिता आढावा बैठकींचे सत्र सुरू असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी या ई – पीक पाहणी च्या कामकाजाचा नियमित आढावा घेत आहेत. आज बुधवारी नेहमीप्रमाणेच अशा आढावा बैठकीचा मेसेज कणकवली तहसीलदारांना आला. मात्र गेले दोन दिवस कणकवली तहसीलदार आर. जे. पवार हे ई – पीक पाहणीच्या आढाव्याकरिता प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन आढावा घेत आहेत. प्रत्येक मंडळा मध्ये भेटी देत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडून तहसीलदार श्री. पवार यांनी आढावा भेटीचे सत्र सुरू केले आहे.
या भेटीदरम्यान आज ते फोंडाघाट येथे असताना प्रत्यक्ष भात शेतीच्या बांधावरूनच श्री. पवार यांनी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना ई – पीक पाहणीच्या कामाचा कणकवली तालुक्याचा आढावा दिला. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ई – पीक पाहणी मध्ये एकूण झालेल्या कामात आजपर्यंत कणकवली तालुका हा पहिल्या स्थानी असल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी ई – पीक पाहणी आढाव्यामध्ये तहसीलदार श्री. पवार यांचे कौतुक देखील केले. ई – पीक पाहणी करिता शासन स्तरावरून सातत्याने आढावा घेतला जात असताना सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यादेखील याकरिता आग्रही आहेत.
आज जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ही बैठक घेत असताना जरी फिल्डवर शेतामध्ये असलात तरी इंटरनेट सुविधा पाहून आहात त्या ठिकाणाहून व्हिडिओ कॉन्फरन्स ला जॉईन व्हा अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या. व त्यानुसार कणकवलीच तहसीलदार थेट फोंडाघाट येथे शेताच्या बांधावरूनच जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये सहभागी झाले. जवळपास पाऊण तास या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये थेट शेतकऱ्यांच्या बांधावरूनच तहसीलदार श्री. पवार सहभागी झाले. कणकवली तहसीलदारांकडून गेले काही दिवस सातत्याने ई – पीक पाहणीचा आढावा प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन सुरू आहे.
तहसीलदार श्री. पवार यांनी आज सायंकाळपर्यंत सातत्याने आढावा घेत शेतकऱ्यांनी व महसूल यंत्रणेमार्फत केलेल्या कामात 6 हजार 800 खातेदारांनी ई- पीक पाहणी केल्याचा आढावा दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ई – पीक पाहणीचे काम करत कणकवली तालुका पहिल्या स्थानी राहिला आहे. आज बुधवारी जानवली, हूंबरट, फोंडाघाट, हरकुळ खुर्द, करंजे, लोरे, तसेच तरळे आदी भागांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जाऊन ई – पिक पाहणीच्या कामाचा आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी देखील जाणून घेतल्या. त्या संदर्भात श्री पवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच 15 ऑक्टोबर पर्यंत ई-पीक पाहणी करण्याकरिता शासनाने मुदत दिली असून, कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांनी ई – पीक पाहणी जास्तीत जास्त करा असे देखील आवाहन श्री पवार यांनी केले आहे.