11 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत होणार प्रदर्शन व स्पर्धा
ओरोस
सिंधुदुर्ग जिल्हा बँक, श्री गणेश मूर्तिकार संघ सिंधुदुर्ग व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धा ११ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील बहुसंख्य मूर्तिकार स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केले आहे.
गणेश उत्सव हा जिल्ह्यातील सर्वात मोठा सण असून तो घरोघरी साजरा केला जातो. या सणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, अशा प्रकारची मानसिकता निर्माण होण्याची गरज आहे. त्याचबरोबर ज्या मूर्तीची आपण मनोभावे प्रतिष्ठापना करून श्रद्धेने आराधना करतो त्या मूर्तीचे पावित्र्य विसर्जनानंतरही अबाधित राहावे म्हणून सहजगत्या पाण्यात विरघळणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना जिल्हावासीयांनी करावी हा संदेश या स्पर्धेतून द्यावयाचा आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूर्तिकारांना पर्यावरण पूरक गणपती मूर्ती बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळणार असून भविष्यामध्ये पर्यावरण पूरक गणपती बनवणारा जिल्हा अशी जिल्ह्याची ओळख व्हावी असाही यामागील हेतू आहे.
या स्पर्धेचे स्थळ ओंकार डीलक्स हॉल कुडाळ असुन प्रदर्शन कालावधी शुक्रवार ११ ते रविवार १३ नोव्हेंबर २०२२ असा राहणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन ११ नोव्हेंबरला होणार असुन बक्षीस वितरण रविवार १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदविण्याची अंतिम तारीख ५ नोव्हेंबर आहे. स्पर्धेत हाती घडवलेल्या मूर्तीला प्राधान्य मात्र साच्यातील मूर्तीही प्रदर्शनात ग्राह्य असेल. तयार केलेल्या मूर्तीमध्ये प्रमाणबद्धता, सुभकता, कल्पकता आवश्यक असून मूर्ती पूजनिय स्वरूपाची असावी. मूर्तीची उंची १८ ते ३६ इंच असावी. पूजनिय मूर्ती तयार करताना मूर्तीचे अलंकार व इतर गोष्टी या मातीच्याच असाव्यात त्यात कृत्रिमता आणू नये. प्रदर्शन स्थळापर्यंत मूर्ती ने आण करण्याची जबाबदारी मूर्तिकाराची राहील, असे स्पर्धेचे नियम आहेत.
स्पर्धकाने आपली मूर्ती ११नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत हॉलवर आणून द्यावयाची आहे. सर्वोत्तम प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ २ अशी पाच बक्षिसे देण्यात येतील. मूर्तीची सुबकता, कौशल्य रेखणी, रंगसंगती या विषयांसाठी प्रत्येकी १ प्रमाणे ४ बक्षीस असतील. बक्षीसांचे स्वरूप सर्वोत्तम प्रथम रोख ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्ती प्रमाणपत्र, सर्वोत्तम द्वीतीय रोख ७ हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्ती प्रमाणपत्र, सर्वोत्तम तृतीय रोख ५ हजार रुपये, स्मृतीचिन्ह व प्रशस्ती प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ २ यांना रोख २,१०० रुपये व प्रशस्ती प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. विशेष कौशल्यासाठी एकूण ४ बक्षीस आहेत. यासाठी रोख १,१०० रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्ती प्रमाणपत्र तसेच सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रशस्ती प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेमध्ये सहभागी घेऊ इच्छिणाऱ्यांनी इच्छुकांनी आपली नावे बापू सावंत, मोबाईल नंबर-९४२२०७८५३९ यांच्याकडे कळवायची आहेत.