सावंतवाडी :
ठाकरे गट व शिंदे गटात शिवसेना, पक्ष चिन्ह यावरून वाद सुरू असतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन उपजिल्हा प्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे, असं वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केले. तसेच आज झूम ॲपद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती करून निवडणूक लढविण्याबाबत तसेच मतदारसंघातील विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निधीबद्दल माहिती दिली.
यावेळी केसरकर म्हणाले, राज्यात बाळासाहेबांची शिवसेना व भाजप यांच्या युती झाली असताना आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये देखील युतीमध्ये निवडणूक लढवावी यासाठी चर्चा झालीय.
आगामी स्थानिक निवडणुका ह्या युती करून लढवल्या जातील. भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याबरोबर देखील या संदर्भात चर्चा झाली आहे. जिल्ह्यातील विकासासाठी व आगामी निवडणूक एकत्र लढवण्यासाठी दोघांमध्ये चर्चा झाल्याचे ते म्हणाले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी भरघोस निधी मंजूर केला असून वेंगुर्ला उभादांडा या कवीवर्य मंगेश पाडगावकर यांच्या गावास कवितांचं गाव म्हणून ओळख देत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली.