धनंजय चंद्रचूड होणार 50 वे सरन्यायाधीश..
सध्या उदय लळीत हे आपल्या देशाचे सरन्यायाधीश आहेत. मात्र, त्यांचा निवृत्ती काळ जवळ आल्यानं आता नवीन सरन्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. लळीत यांनी आपल्या जागी न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करावी, अशी शिफारस केंद्राकडे केली आहे. त्यामुळे न्यायमूर्ती चंद्रचूड आपल्या देशाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून कार्य करणार आहेत. पुन्हा एकदा मराठी व्यक्तीला देशाचे सरन्यायाधीश होण्याची संधी मिळणार आहे. धनंजय हे माजी सरन्यायाधीश यशवंत व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत.
सरन्यायाधीश उदय लळीत यांनी 27 ऑगस्ट 2022 रोजी देशाचे 49वे चीफ जस्टीस म्हणून शपथ घेतली होती. ते 8 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून डी. वाय. चंद्रचूड यांची शिफारस करणारं पत्र केंद्र सरकारला दिलं आहे. सरन्यायाधीश लळीत यांच्या पूर्वीच्या बहुतांश सरन्यायाधीशांचा कार्यकाळ सरासरी दीड वर्षांचा राहिला आहे. मात्र, लळीत यांचा कार्यकाळ केवळ अडीच महिन्यांचा होता. सरन्यायाधीश लळीत निवृत्त झाल्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड पुढील महिन्यात 9 नोव्हेंबर रोजी देशाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. डी. वाय. चंद्रचूड यांचा कार्यकाळ 2 वर्षं आणि 1 दिवसाचा असेल. ते 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होतील.