You are currently viewing दशावतारी क्षेत्रातील तरुण पिढीतील चमकता तारा शांती कलिंगण यांचे निधन

दशावतारी क्षेत्रातील तरुण पिढीतील चमकता तारा शांती कलिंगण यांचे निधन

कुडाळ :

 

दशावतारी क्षेत्रातील तरुण पिढीतील चमकता तारा विनोदी आशयाचा होतकरू खलनायक ओंकार रामचंद्र कलिंगण उर्फ शांती कलिंगण यांचे आज सकाळी गोवा येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. मृत्यू समई त्यांचे वय (३० वर्ष) होते. दशावतारी क्षेत्रातील तरुण पिढीतील चमकता तारा अकाली निखळ्यामुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यत होत आहे. शांती कलिंगण हे नेरूर देसाईवाडा येथील रहिवासी तिथूनच त्यांनी आपल्या कलात्मक कारकिर्दीला सुरुवात केली. आजोबा स्वतः मालक बाबी कलिंगण, वडील भाई कलिंगण, काका लोकराजा नटसम्राट कै. सुधीर कलिंगण, बाळा कलिंगण, काका कलिंगण यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांच्या सहवासात शांती कलिंगण यांचे कलात्मक अंग विकसित झाले. म्हणूनच तर कलिंगण कुटुंबियातील सिद्धेश कलिंगण, आबा कलिंगण यांच्या बरोबरीने युवा पिढीतील दर्जेदार दशावतारी कलाकार म्हणून शांती कलिंगण यांनी दशावतारी क्षेत्रात आपला ठसा उमटवला. कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाच्या माध्यमातून पौराणिक, काल्पनिक, ऐतिहासिक, संत साहित्यावर आधारित दशावतारी नाट्य कथानकांमध्ये शांती कलिंगण यांचा विनोदी आशयाचा खलनायक कमालीचा भाव खाऊन गेला.

दशावतारी क्षेत्रात एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून त्यांनी प्रचंड लोक आवड निर्माण केली होती. मयूर गवळी यांच्या दशरथ कौशल्या विवाह या संयुक्त दशावतारातील भाव अंतरीचे हळवे या लंगार गीतावर अज राजाची भूमिका करणाऱ्या लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांच्या बरोबरीने जम्बू राक्षसाची भूमिका करणाऱ्या शांती कलिंगण यांची थिरकणारी पावलं दशावतारी नाट्य रसिक कधीच विसरू शकणार नाही. म्हणूनच तर दशावतारातील प्रसिद्ध हार्मोनियम वादक मयूर गवळी यांचे भाव अंतरीचे हळवे हे लंगार गीत सुपरहिट होऊन गेले. सिंधुदुर्ग, गोवा, मुंबई येथे होणाऱ्या संयुक्त दशावतारी नाटकात शांती कलिंगण यांना विनोदी खलनायक करण्यासाठी अवर्जून सामावून घेतलं जायचं. त्यांनी दशावतारात सादर केलेला विनोदी आशयाचा ब्रम्हरक्षस आणि जम्बू राक्षस रसिकांच्या कायम समरणात राहिला. आठ दिवसापूर्वी त्यांची तब्बेत अचानक खालवली त्यांना गोवा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान दुर्दैवाने आज सकाळी त्यांचे वयाच्या ३० व्या वर्षी दुःखद निधन झाले. शांती कलिंगण यांच्या अकाली निधनाची दुःखद वार्ता दशावतारी समीक्षकांच्या, दशावतारी नाट्य रसिकांच्या, दशावतारी कलाकारांच्या जिव्हारी लागणारी आहे. त्यांच्या अकाली जाण्याने सिंधुदुर्गावर शोककळा पसरली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा