You are currently viewing सावंतवाडीत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

सावंतवाडीत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

युवराजांनी सामाजिक आरोग्याच्या बाबतीत घेतलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असून आरोग्य सेवेमुळे जनतेला एक नवा आधार मिळाला – केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू

राजकारणात उतरलो तो लोकांच्या सेवेसाठीच; राजघराण्यांनी कायम प्रजेचे हित, आरोग्य पाहिले तेच आम्ही पुढे नेत आहोत – युवराज लखमराजे भोसले

 

सावंतवाडी :

सावंतवाडी संस्थान आणि सावंतवाडी येथील अटल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर, डॉ. अमेय देसाई, भा जपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद चव्हाण, डॉ. राजेश नवांगुळ. डॉ. राजशेखर कार्लेकर, भाजप कार्यकारणी सदस्य पुखराज पुरोहित, अभिनव उषःकाल सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगलीचे संचालक डॉ. संजय खोग्रेकर तसेच त्यांची संपूर्ण टीम व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सावंतवाडी संस्थान सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा निरंतर प्रयत्न करीत आहे. कोकणची जनता आणि राजघराणे यांच्यात संस्थान काळापासून सलोख्याचे संबंध राहिले आहेत, संस्थान काळापासून राजघराण्याने सामाजिक योगदान निरंतर दिले आहे. हाच वारसा चालवण्याची क्षमता युवराज लखम राजे यांच्यात असून अशाच सामाजिक कार्यक्रमांतून त्यांनी हा वारसा निरंतर जोपासला आहे. याचा सार्थ अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी राजवाडा येथे आयोजित कार्यक्रमात केले.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी “आजच्या काळात डॉक्टर हे देवाचे रूप आहेत. आपण कोणत्याही परिस्थितीत असलो तरी डॉक्टरांच्या एका साध्या स्पर्शाने रुग्णांना संजीवनी मिळते. अशीच संजीवनी देण्याचे काम राजघराण्याकडून होत आहे. याचा विशेष आनंद वाटतो. युवराजांनी सामाजिक आरोग्याच्या बाबतीत घेतलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असून या आरोग्य सेवेमुळे येथील जनतेला एक नवा आधार मिळाला आहे. युवराजांनी केलेले हे काम निश्चितच कौतुकास्पद आहे,” असे सांगितले.

प्रभू पुढे म्हणाले की, जगभरात अदृश्य विषाणू व्हायरल झाल्याने हाहाकार उडाला. कोविड येईल आणि जीवनावर त्याचा प्रभाव पडेल असे कोणालाही वाटले नव्हते. यामुळे आरोग्य व जीवनाची काळजी घेण्याची प्रेरणा जनतेला मिळाली. जगातील प्रत्येक माणूस सुरक्षित नसेल तर जग सुरक्षित नाही असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. त्याची आठवण प्रभू यांनी करून दिली.ते म्हणाले, कोकणात देवदेवतांची स्थाने मोठ्या प्रमाणात आहेत. कोकणातील माणूस हा पापभिरू आहे. त्यामुळे महा आरोग्य शिबिरातून चांगले यश मिळेल.

युवराज लखमराजे भोसले यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपण कोणत्याही राजकीय अभिलाषेपोटी राजकारणात आलो नाहीत, हे स्पष्ट केले. आपल्या कुटुंबाला राजकारणापेक्षा सामाजिक सेवेचा वारसा आहे आणि म्हणूनच आजच्या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी राजघराणे कायम प्रजेचे हित, आरोग्य पाहिले तेच आम्ही पुढे नेत आहोत. राजकारणात उतरलो तो लोकांच्या सेवेसाठीच. पूर्वजांच्या पुण्याईने मला जनता मानसन्मान देते. त्यांची सेवा करणे हे माझे मी कर्तव्य मानतो. यापुढेही आपण कोणतीही अपेक्षा न ठेवता, केवळ सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून येथील जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रारंभी मान्यवरांचे स्वागत युवराज लखमराजे भोसले व ॲड. नकुल पार्सेकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. पार्सेकर यांनी केले ते म्हणाले की, या महाआरोग्य शिबिराचे आयोजन सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून केले. जगात प्रभू फिरत आहेत त्यामुळे ते सतत आपल्या लोकांबद्दल आदर ठेवून काम करत असतात. या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांना धन्यवाद दिले. यावेळी उषःकालचे संजय खोग्रेकर यांनी रूग्ण सेवाबाबत संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद दिले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. राजशेखर कार्लेकर यांनी केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विविध भागांतून आलेल्या रुग्णांची तपासणी व त्यांच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या.

शिबिरात सुमारे १५० पेक्षा जास्त शिबिरार्थी यांनी सहभाग घेतला. यावेळी ज्येष्ठ चित्रकार एस. बी. पोलाजी, माजी नगरसेवक अफरोज राजगुरू, डी. के. सावंत, डॉ. सुरेश सावंत, मोहन होडावडेकर, डॉ. जी. ए. बुवा, प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, डी. टी. देसाई, डॉ. गणेश मर्गज, गोविंद प्रभू तसेच मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा