You are currently viewing मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दिवाळी रेशन मागणीच्या आंदोलनाला यश

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दिवाळी रेशन मागणीच्या आंदोलनाला यश

राज्य सरकारच्या निर्णयाने सर्वसामान्यांची दिवाळी होणार गोड

इचलकरंजी

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गोरगरीब जनतेचा रेशनचा हक्क सुरक्षित रहावा आणि त्यांना रेशनकार्डवर दिवाळी सणासाठी रवा, हरभरा डाळ ,साखर आणि गोडेतेल अल्प दरात उपलब्ध करुन द्यावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यासह इचलकरंजी पुरवठा कार्यालय व कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता.तसेच राज्य सरकारने या मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता.या आंदोलनाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने रेशनकार्ड धारकांना केवळ शंभर रुपयांमध्ये एक किलो रवा , हरभरा डाळ ,साखर आणि १ लिटर पामतेल
अशा वस्तू उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा केली आहे.त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या रेशन मागणीच्या आंदोलनाला यश मिळाले असून राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

राज्यातील उद्योग व्यवसायांमधील तेजी – मंदी आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कष्टकरी , कामगार ,श्रमिक वर्गाच्या रोजगाराच्या बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.त्यात कामगारांचे कायदे मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरु झाला असून त्यांचे जगणे बेभरवशाचे झाले आहे.विशेषत: यंञमाग उद्योग व त्याच्याशी उद्योग क्षेत्रातील कामगारांना शासनाच्या कोणत्याच सुविधा नसल्याने केवळ तुटपुंज्या कमाईवरच त्यांना कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागत आहे.त्यात वाढत्या महागाईमुळे दसर , दिवाळी सण साजरा करणे देखील मुश्किल बनले होते.याच अनुषंगाने राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने
गोरगरीब जनतेचा रेशनचा हक्क सुरक्षित रहावा आणि त्यांना रेशनकार्डवर दिवाळी सणासाठी रवा, हरभरा डाळ ,साखर आणि गोडेतेल अल्प दरात उपलब्ध करुन द्यावे या मागणीसाठी आंदोलनाची हाक दिली होती.तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीने २० हजार पत्रके आणि मी रेशन हक्क सोडणार नाही,असे अर्ज छापून ते घरोघरी जाऊन वाटप केले होते.
याचाच एक भाग म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने
कामगार ,शेतकरी ,शेतमजूर महिला यांना सोबत घेऊन
इचलकरंजी पुरवठा कार्यालय व कोल्हापूर जिल्हा कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आपल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करुन तातडीने कार्यवाही करावी ,अन्यथा तीव्र आंदोलन व वेळ प्रसंगी जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा सचिव प्राचार्य काॅम्रेड ए. बी.पाटील यांच्यासह जेष्ठ कामगार नेते दत्ता माने ,आनंद चव्हाण ,भरमा कांबळे ,सदा मलाबादे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला होता.तसेच याच मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यभरात विविध ठिकाणी शासकीय कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले होते.या आंदोलनाची राज्य सरकारने गंभीर दखल घेत दिवाळी सणासाठी
राज्यातील रेशनकार्ड धारकांना केवळ शंभर रुपयांमध्ये शिधा संच देणार असल्याची घोषणा केली असून यामध्ये एक किलो रवा , हरभरा डाळ , साखर आणि एक लिटर पामतेल अशा वस्तूंचा समावेश आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दिवाळी सणासाठी रेशन मागणीच्या
आंदोलनाला यश मिळाले असून सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा