हक्काचा पालकमंत्री आणि हक्काचे सरकार आपल्याला विकास निधी देतील
सात वर्षात ठाकरे सरकारने या मतदारसंघावर सातत्याने अन्याय केला
विकासाचा बॅकलॉग यापुढे नक्कीच भरून निघेल आमदार राणे यांचा विश्वास
कणकवली :
भाजपा युतीचे राज्यात सरकार आले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने मिळाला. आता कणकवली विधानसभा मतदारसंघाचा वनवास संपला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये सर्वात जास्त त्रास कणकवली मतदार संघाला दिला गेला. कणकवली, देवगड, वैभववाडी येथील विकास कामे रखडवली गेली. शासकीय निधी देण्यास सातत्याने टाळाटाळ केली, असे असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचा या मतदारसंघातील कार्यकर्ता डगमगला नाही. हिमतीने काम करीत राहिला. प्रत्येक निवडणुकीत पक्षासाठी निष्ठा आणि समर्पित भावनेने काम करून शंभर टक्के यश भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या मतदारसंघात मिळवून दिले आणि पक्ष शतप्रतिशत भाजपा म्हणून सिद्ध केला, असे कार्यकर्त्यांप्रती गौरवोद्गार भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.
कणकवली येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आमदार नितेश राणे म्हणाले, आम्ही गेली सात वर्षे दुःख सहन केलेले आहे. ठाकरे सरकारच्या काळात आम्हाला कोणताच विकास निधी मिळाला नाही. प्रत्येक वेळी नितेश राणेंचा मतदारसंघ म्हणून या ठिकाणचा विकास रखडवला गेला. रस्ते विकास,साकव बांधणी, मुख्यमंत्री ग्रामसडक अशा प्रत्येक विभागाची सुचवलेले कामे बाजूला काढले गेलीत, असे असतानाही खंबीरपणे कार्यकर्ता पक्षासाठी काम करत राहिला. मग ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद,विधान सभा निवडणुकांमध्ये तन-मन धन अर्पून यश मिळावीत राहिला. त्यामुळे मला या कार्यकर्त्यांचा फार अभिमान आहे.आता यापुढे पालकमंत्री आणि आपले सरकार असल्यामुळे या मतदारसंघाचे दुःख संपले आहे शंभर टक्के विकास निधी आपल्याला मिळणार आहे. असा विश्वास यावेळी नितेश राणे यांनी व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले, कमळ निशाणी वरील पालकमंत्री दिल्या बद्दल वरिष्ठांचे मी आभार मानतो. कार्यकर्त्यांनी सुचवलेकी कामे यापुढे मार्गी लागतील याचा मला विश्वास आहे. विकासासाठी येणारा निधी मागे जाणार नाही तो 100% खर्च होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू.रेल्वे ब्रीज साठी सुद्धा आपल्या सरकारने निधी दिलेला आहे त्यामुळे प्रत्येक विकास काम टप्प्याटप्प्याने पूर्णत्वास नेऊया असे आवाहन यावेळी श्री.तेल यांनी केले.